कुडाळ:
मला कुठल्या पदासाठी ही निवडणूक लढवायची नाही तर राणे साहेबांनी या कुडाळ मालवण मतदार संघाला संपूर्ण महाराष्ट्रात मिळवून दिलेली ओळख गेल्या दहा वर्षात हरवली आहे ती ओळख पुन्हा मिळवून देण्यासाठी ही निवडणूक लढवतोय असं स्पष्ट प्रतिपादन कुडाळ मालवण मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार मजी खासदार निलेश राणे यांनी केले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत निलेश राणे यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केल्यानंतर ते बोलत होते. या वेळी केलेल्या त्यांच्या भाषणातील प्रत्येक शब्दात या मतदार संघाबद्दलची त्यांची आत्मीयता आणि या मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांचा असलेला निर्धार व्यक्त होत होता. निलेश राणे म्हणाले शिवसेना पक्षप्रवेश ही माझ्यासाठी नवीन सुरुवात आहे. जेव्हापासून आयुष्य म्हणजे काय हे समजू लागलं तेव्हापासून राणेसाहेबांच्या सावलीतून बाहेर गेलो नाही आणि जाणार नाही. मी कधी उद्याचा विचार केला नाही. गेल्या अडीच वर्षात पक्षाकडून अनेक प्रस्ताव आले. विधान परिषद,लोकसभा यासाठी विचारणा झाली. मात्र ज्या मतदारसंघात राणे साहेबांचा पराभव झाला तो मतदार संघ पुन्हा मिळवायचा आणि या मतदार संघाचे हरवलेली ओळख पुन्हा मिळवायची यासाठी मी इथे उभा आहे. या मतदार संघाला 10 वर्षांपूर्वी कधी निधी मागायला लागला नव्हत. मंत्रालयातले अधिकारी प्रत्येक योजनेचा निधी या मतदार संघात वळवत होते. मात्र आता ती ओळख, दरारा राहिला नाही. हा मतदारसंघ जिल्ह्याचे मुख्यालय आहे, जिल्ह्याचे नाक आहे. पण ती ओळख गेल्या दहा वर्षात विसरली गेली आहे, ती ओळख परत आणायची आहे. राणे साहेबांनी जे निर्माण केलं पुन्हा घडवायचा आहे. म्हणूनच गेली दहा वर्ष मी गप्प बसलो नाही, काम करत राहिलो, दहा वर्ष मी माझी माती सोडली नाही, माणसं सोडली नाही, आणि माझ्या आयुष्यात कधी मी सोडणार नाही. लोकांना माझी एकच बाजू दिसते पण मी कसा आहे हे मी लोकांना सांगत राहीलो नाही, फक्त काम करत राहिलो. गेल्या दहा वर्षात अनेक माणसं निघून गेली तर अनेक माणसं सोबत राहिली, जी सोबत राहिली त्यांनी मला सोडलं नाही. माझ आडनाव राणे आहे, ही निवडणूक म्हणजे माझा लाल दिव्यासाठी पाठलाग नाही, लहानपणापासूनच मी लाल दिवा पाहिला आहे. मला इथल्या आमदारावर टीका करायची नाही, बोलायचं नाही, बोलण्यासारखं नाही, मी त्यांचा सारखा ट्रॅक्टर घेऊन शेतात जाणार नाही तर मी शेतकऱ्यांच्या प्रश्न सोडवण्यासाठी काम करेन आणि हीच माझी कामाची पद्धत आहे. यांचे घर ठेकेदारीवर चालतं, पण मी काम करताना कधीच टेंडर घेणार नाही मी फक्त आणि फक्त इकडच्या लोकांच्या विकासासाठी काम करणार आहे. याचसाठी माझा संघर्ष सुरू आहे आणि इथल्या लोकांच्या विश्वासावर येत्या 23 नोव्हेंबरला महायुतीचेच फटाके फुटणार आणि महायुतीचाच गुलाल उधळणार असा विश्वास निलेश राणे यांनी व्यक्त केला.










