राजापूर | प्रतिनिधी : काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राजापूर विधानसभा मतदार संघ महाविकास आघाडीत काँग्रेसला द्यावा अशी आग्रही मागणी केलेली असतानाही काँग्रेस पक्षाला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकही जागा न मिळाल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळेच काँग्रेस पक्षाकडून राजापूर-लांजा-साखरपा या मतदार संघामधून अविनाश लाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून काँग्रेस पक्षाचे आंम्ही सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते लाड यांच्या ठामपणे पाठीशी उभे असल्याची माहिती काँग्रेसचे तालुका अध्यक्ष किशोर नारकर यांनी दिली आहे. तसे एक प्रसिध्दी पत्रक नारकर यांनी जारी केले आहे.
राजापूर विधनसभा मतदार संघातुन अविनाश लाड यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी केली होती. मात्र त्याबाबत विचार न करता सदर जागा विद्यामान आमदार राजन साळवी यांना देण्यात आली. त्यामुळे या मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या अस्त्विाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
कार्यकर्त्यांनी मागणी केल्यानुसार अविनाश लाड यांनी दिनांक २४/१०/२०२४ रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे व तसे पक्षाच्यावरीष्ठ नेत्यांनाही कळविले आहे. हा फॉर्म भरताना केवळ काँग्रेस कार्यकत्यांचे मनोबळ वाढविणे व प्रलंबीत राहीलेल्या विकासकामांना (रोजगार, शिक्षण, आरोग्य व भौतिक सुविधा) चालना मिळावी या उद्देशाने हजारो कार्यकत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. लांजा-राजापूर तालुक्यातील बहुसंख्य कार्यकर्ते हे अविनाश लाड यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहेत. त्यामुळे लाड यांना आमचा ठाम पाठींबा असून त्यांच्या विजयासाठी आंम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करू असे नारकर यांनी नमुद केले आहे.










