दोघांवर नाटे पोलिसांची कारवाई
राजापुर । प्रतिनिधी : राजापूर तालुक्यातील अणसुरे दांडे पुलाच्या पुढे जंगलमय भागात शिकार करण्याच्या उद्देशाने सिंगल बॅरल बंदुक, 2 जिवंत काडतुसे बाळगणार्यां दोघांना नाटे पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई रविवार 27 ऑक्टोबर रोजी सकाळी 6.15 वा. करण्यात आली.
दर्शन दशरथ तांबे (22) आणि प्रशांत सहदेव धरमकर (36) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात पोलिस शिपाई अमोल गायकवाड यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, रविवारी सकाळी दोन्ही संशयित हे अणसुरे दांडे पुलाचे पुढे काही अंतरावर जंगलमय भागात एकमेकांच्या संगनमताने वन्यप्राण्यांची शिकार करण्यासाठी आपल्या ताब्यात 50 हजार रुपयांची सिंगल लोखंडी बॅरल 12 बोअर बंदुक, 2 शक्तीमान एक्सप्रेस 12 या कंपनीची जिवंत काडतुसे, मोबाईल, लोखंडी बॅटरी, हेड टॉर्च असे एकूण 60 हजार 350 रुपयांचे साहित्य बाळगून असताना मिळून आले. पोलिसांनी त्यांची चौकशी केल्यावर त्यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने पोलिसांनी दोघांनाही मुद्देमालासह ताब्यात घेतले. दोघांविरोधात भारतीय हत्यार कायदा कलम 3(1)25 सह भारतीय न्याय संहिता कलम 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे











