गुहागरात मनसेमध्ये बंडखोरी नाही…

 

मनसेचे उमेदवार प्रमोद गांधी हे विक्रमी मतांनी निवडून येतील

उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर

गुहागर l प्रतिनिधी :गुहागर विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये कोणीही बंडखोरी केली नसून खेड तालुक्यातील संदीप फडकले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी त्यानी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. संदीप फडकले यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी मनसेच्या तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा सादर केला आहे. त्यामुळे ते आता मनसेचे कुठलेही पदाधिकारी नाहीत.

गुहागर विधानसभा क्षेत्रात मनसेमध्ये बंडखोरी झाली म्हणणे चुकीचे असल्याचे गुहागर विधानसभा क्षेत्र उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले की,मनसेचे अधिकृत उमेदवार म्हणून गुहागर मधून गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. प्रमोद गांधी यांना गुहागर मधून उमेदवारी मिळण्यासाठी गुहागर, चिपळूण, खेड तालुक्यातील सर्व मनसे कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कडे मागणी केली होती. कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार प्रमोद गांधी यांना उमेदवारी देण्यात आली तसेच उमेदवारी अर्ज दाखल करताना मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर जिल्हा अध्यक्ष संतोष नलावडे व मनसेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. त्यामुळे गुहागर विधानसभा क्षेत्रात प्रमोद गांधी सोडून इतर कोणत्याही पदाधिकाऱ्याने उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. खेडचे संदीप फडकले यांनी वैयक्तिकरित्या उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे त्यांनी सादर केलेल्या उमेदवारी अर्जाचा मनसे पक्षाचा काहीही संबंध नाही. प्रमोद गांधी विक्रमी मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला.