देव, घैसास, कीर, महाविद्यालयात पत्रलेखन, ई मेल रायटिंग कार्यशाळा

रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर कला, वाणिज्य, विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी विभाग, स्टुडंट्स इंग्लिश लिटररी फोरम (सेल्फ) विभागातर्फे पत्रलेखन व ई मेल रायटिंग या क्षमता वृद्धिंगत अभ्यासक्रमावर आधारित एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली.

नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित असणारा क्षमता वृद्धिंगत अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकसित होणे आवश्यक आहे. पत्रलेखन व ई- मेल लेखन हे लिखाणापुरता येणारा भाग अभ्यासक्रमामध्ये येत असतो. त्यामुळे ज्यावेळी दैनंदिन जीवनात त्याचा वापर करताना विद्यार्थ्यांना कठीण जाते. म्हणूनच विद्यार्थ्यांना पत्रलेखन व ई- मेल लेखन याचे प्रात्यक्षिक दाखवले.

कार्यशाळेचे आयोजन स्टुडन्ट इंग्लिश लिटररी फोरम या इंग्रजी विभागाकडून व क्षमता वृद्धिंगत अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी केले. यात इंग्लिश विभागप्रमुख प्रा. वसुंधरा जाधव यांनी मार्गदर्शन करून प्रात्यक्षिक दाखवले. यामध्ये पत्राचे विविध प्रकार, पत्र मांडण्याचे परंपरागत व आधुनिक प्रकार, विविध पत्रासाठी विषयानुसार कागदांची व लखोट्यांची निवड, पत्राच्या कागदाच्या घड्या व लखोटा भरणे या संदर्भात संपूर्ण माहिती दिली व विद्यार्थ्यांकडून नोकरी अर्जाचे प्रात्यक्षिक करून घेतले. ई-मेलचे सध्याचे महत्व सांगून मुलांकडून नोकरी अर्जाच्या ई-मेल चे प्रात्यक्षिक घेतले व मेल ई-मेल आयडी वरती जमा करून घेतले. कार्यशाळेस प्रथम वर्ष कला, वाणिज्य व विज्ञान विभागांच्या विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यशाळेस महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या मधुरा पाटील यांचे सहकार्य लाभले.