सर्वसामान्यांचं हित जोपासणाऱ्या महायुतीला पुन्हा संधी द्या : दीपक केसरकर

दलित समाज मेळाव्यात महायुतीला पाठिंबा

सावंतवाडी । प्रतिनिधी : जीवनात यशस्वी होण्यासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर समोर ठेवून चाला. कोणीतरी पैसे देऊन मत विकत घेवू पहात असेल तर त्याला थारा देऊ नका. अमिषाला बळी पडू नका. सर्वसामान्यांच्या हिताच्या योजना आणणाऱ्या महायुती सरकारला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन महायुतीचे उमेदवार शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले. सावंतवाडीतील वैश्य भवन येथे आयोजित महायुतीच्या दलित समाज मेळाव्यात ते बोलत होते.
ते म्हणाले, बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटीत व्हा अन् संघर्ष करा अशी शिकवण दिली. त्या तत्त्वानुसार आम्ही चालतो. लोकशाहीचं महत्व पटवून देताना आमिषाला बळी पडू नका असंही त्यांनी सांगितलं आहे. त्याचं पालन करा. तुमच्या उत्कर्षासाठी महायुती सरकार बांधील आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व पुण्यश्लोक बापूसाहेब यांचा न्यायनिवाड्याचा सावंतवाडीतील किस्सा त्यांनी यावेळी सांगितला.
जर्मनीमध्ये येथील कौशल्यप्रधान मुलांना संधी आहे. ती संधी साधा, कोणताही व्यवसाय करण्यात कमीपणा बाळगू नका. फायदा होणारा कोणताही व्यवसाय तुम्ही करावा. त्यासाठी शिक्षण हे फार महत्त्वाचे आहे. केवळ राजकारणात एकत्र न येता समाज म्हणून एक राहणं आवश्यक आहे. आपल्या मुलांना शिक्षण देणं व रोजगार, व्यवसायासाठी प्रेरणा द्यावी, असं ते म्हणाले.

सावंतवाडीचं समाजमंदिर माझ्या संकल्पनेतून साकारलं आहे. त्यावेळी आपल्या सर्व वस्त्यांमध्ये रस्ता, पाणी, वीज घराघरात पोहचवली. रचनाबद्ध कारभार केला. येत्या २६ नोव्हेंबरच्या संविधान यात्रेत पुन्हा आमदार व मंत्री म्हणून मी सहभागी होणार आहे. त्यासाठी तुमचा आशीर्वाद द्या, असे आवाहन दीपक केसरकर यांनी केले.

सावंतवाडी तालुक्यातील शिवसेना, भाजप, रिपाई महायुतीचा दलित समाज मेळावा वैश्य भवन येथे पार पडला. यावेळी महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी,माजी सभापती अंकुश जाधव, भाजपचे चंद्रकांत जाधव, गुंडू जाधव, गुरू कासले, राजन कांबळे, हर्षदा जाधाव, तानाजी कुणकेरकर, सोनीया मठकर, अर्चना जाधव, लाडू जाधव आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.