कोकणातील सर्वच्या सर्व जाग जिंकून कोकण महायुतीचा बालेकिल्ला असल्याचे सिध्द करून दाखवूया
राजापूर | प्रतिनिधी : कोकण हा महायुतीचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला कोकणातील सर्व मतदार संघात महायुतीच्या उमेदवारांना भरघोस अशा मतांनी विजयी करून त्यावर शिक्कामोर्तब करावयाचे आहे. यासाठी आत्तापासून २० तारखेपर्यंत तुम्ही स्वताच उमेदवार आहात असे समजून कामाला लागा, वाडी वस्ती आणि घराघरात जाऊन महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करा आणि त्यांना विजयी करा असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण यांनी ओणी येथे केले.
राजापूर- लांजा, साखरपा विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांच्या प्रचारासाठी ओणी गजानन मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात ना. चव्हाण बोलत होते.
यापुर्वी महायुती म्हणून लोकसभेत चांगले काम करून आपण विजय मिळविलेला आहे. त्यामुळे या निवडणूकीतही आपल्याला जिंकायचे आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहचवा, मुख्यमंत्री लाकडी बहिण, शेतकरी सन्मान योजना, ज्येष्ठ नागरीक यांसह विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांपर्यंत तुंम्ही पोहचा असे आवाहन ना. चव्हाण यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एक शक्तीशाली भारत देश निर्माण होत आहे, तर महाराष्ट्र राज्यानेही विकासात्मक घौडदौड करत प्रगतीकडे झेप घेतली आहे. केंद्र व राज्यातील डबल इंजिन सरकारच्या माध्यमातुन आपल्याला भविष्यात विकास करायचा आहे, त्यासाठी राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणे आवश्यक आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातुन मोठया प्रमाणावर आपण निधी दिला आहे. तर राजापूरच्या पाणीयोजनेसह अन्य कामांसाठी महायुती सरकारने निधी दिला आहे. तर भविष्यातही आपल्याला या मतदार संघात विकास करायचा आहे. त्यासाठी महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांना विधानसभेत पाठविले पाहिजे असे आवाहन ना. चव्हाण यांनी केले.
महायुतीच्या प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याने वाडी वस्तीवर जाऊन प्रचार केला पाहिजे, प्रत्येक बुथवर आपल्याला ७० टक्के मतदान कसे होईल यासाठी नियोजन केले पाहिजे, एकमेकांशी समन्वय साधून यासाठी काम केले पाहीजे असे आवाहन ना. चव्हाण यांनी यावेळी केले.












