
खासदार डॉ. श्रीकांत शिंदेचा उध्दव ठाकरेंवर घणाघात
सव्वा दोन वर्षात विकासात्मक काम आणि लोककल्याणकारी योजना राबवून महायुती सरकारने महाराष्ट्र प्रगतीपथावर नेलाय
राजापूर | प्रतिनिधी : राज्यातील महायुती सरकारने आपल्या सव्वा दोन वर्षाच्या कार्यकाळात विकासात्मक काम करताना लोककल्याणकारी योजना राबवून सर्वसामान्य माणसांचं सरकार म्हणून काम केलं आहे. ज्यांनी अडीज वर्षात स्वताला बंद करून घेत महाराष्ट्र बंद ठेवण्याचे काम केले ते काय विकास करणार असा खडा सवाल उपस्थित करून हिंमत असेल तर समोरासमोर या होऊन जाऊद्या तुमच्या अडीज वर्षाच्या आणि आमच्या सव्वा दोन वर्षाच्या कामाची तुलना बघा महाराष्ट्राला पुढे नेण्याचे काम कुणी केले ते सिध्द होईल असे आव्हान शिवसेना नेते व लोकसभेतील गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी महायुतीच्या मेळाव्यात बोलताना उध्दव ठाकरे यांना दिले.
केवळ फेक नेरेटिव्ह पसरवून सहानुभुती मिळविण्याचे काम करणाऱ्यांकडे सिंपत्ती नाही तर केवळ संपत्ती आहे टोला लगावतानाच विकासाचे कोणतेही काम यांच्याकडे सांगण्यासारखे नाही म्हणून ते विकासावर कधीच बोलत नाहीत केवळ शिव्या देण्याचा एककलमी कार्यक्रम त्यांच्याकडे आहे असा घणाघातही डॉ. शिंदे यांनी यावेळी केला.
राजापूर- लांजा, साखरपा विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांच्या प्रचारासाठी ओणी गजानन मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात डॉ. शिंदे बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, उदयोगमंत्री उदय सामंत, खासदार धर्यशिल माने, उमेदवार किरण सामंत, माजी आमदार प्रमोद जठार, भाजपा नेते अतुल कालसेकर, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, भाजपा प्रदेश महिला सचिव सौ. शिल्पा मराठे,राष्ट्रवादीचे बंटी वणजू, भाजपा जिल्हा सरचिटणीस रवींद्र नागरेकर, शिवसेना जिल्हा प्रमुख राहुल पंडीत, उपजिल्हाप्रमुख अशफाक हाजू, तालुका प्रमुख दीपक नागले, भाजपा तालुका प्रमुख सुरेश गुरव, भास्कर सुतार, भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते राजन देसाई, भाजपा ओबीसी प्रदेश सचिव अनिलकुमार करंगुटकर आदींसह भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, रासप व आरपीआय सह घटकपक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना डॉ. शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेत्वाखाली केंद्र सरकारच्या भक्कम अशा पाठबळामुळे गेल्या सव्वा दोन वर्षात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांच्या सरकारने भरीव असे काम केले आहे. विविध मोठे प्रकल्प मार्गी लावताना शेतकरी, युवक, महिला, ज्येष्ठ नागरीक यांसह सर्व जाती, धर्माच्या लोकांसाठी लोककल्याणकारी योजना राबवून महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देण्याचे काम केले आहे.
राज्याने औद्योगिक प्रगतीत देशात नंबर एकचे स्थान पटकावले असून ५२ टक्के इतकी परदेशी गुंवणूक राज्यात आली आहे. राज्याचे उदयोगमंत्री उदय सामंत यांच्या सक्षम नेतृत्वामुळे उद्योगात राज्य भरारी घेत आहे. १ लाख १७ हजार कोटींची गुंवणूक राज्यात आली आहे. ही अभिमानाची बाब असून राजापूर मतदार संघातही भविष्यात पर्यावरण पुरक असे उद्योग सरकार आणार असून यातुन रोजगार निर्मिती होणार असल्याचे डॉ. शिंदे यांनी नमुद केले. राज्यात उद्योग धंदे आणून राज्याचे प्रगती करणारे, युवकांना रोजगार देणारे हे सरकार आहे, उद्योजकांच्या घराखाली बॉम्ब ठेवणारे आणि ते ठेवणाऱ्याची पाठराखण करणारे हे सरकार नाही असा टोलाही डॉ. शिंदे यांनी लगावला. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण यांचे संपुर्ण कोकणात असलेले काम कौतुकास्पद असल्याचे नमुद करत त्यांच्या भक्कम पाठबळाने आपण आपण नक्कीच कोकणात भरीव काम करू असेही ते म्हणाले. ना. सामंत व ना. चव्हाण हे केवळ मतदार संघापुरते नाही तर राज्य पातळीवर काम करतात हे संघटनेसाठी अभिमानास्पद असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले.
यासाठी सरकाराचे काम, योजना लोकांपर्यंत पोहचवा आणि किरण सामंत यांना विजयी करा राजापूर मतदार संघाचा विकासाचा बॅकलॉग आंम्ही भरून काढू असा विश्वास यावेळी डॉ. शिंदे यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला.












