सिंधुदुर्गातील तिन्ही जागांसह कोकणातील सर्व जागा जिंकून राज्यात शाश्वत बहुमताने महायुतीचे सरकार येणार
किरण सामंत राजापूरच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढतील
राजापूर प्रतिनिधी ही निवडणूक विकास व प्रगती विरूध्द विकासाला विरोध अशी आहे. महाविकास आघाडी सरकारने आपल्या काळात महाराष्ट्राच्या विकास आणि प्रगती रोखण्याचे काम केले. मात्र त्यानंतर सत्तेत आलेल्या महायुती सरकारने प्रगतीची कवाडे खुली करत राज्याला औद्योगिक प्रगतीच्या बाबतीतही पहिल्या क्रमांकावर नेले आहे. अनेक योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत त्यामुळे राज्यातील व कोकणातील जनता महायुतीच्या म्हणजेच विकास आणि प्रगतीच्या बाजुने आपला कौल देईल असा विश्वास भाजपचे जेष्ठ नेते आणि प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी राजापुरात आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
सिंधुदुर्ग जिल्हयातील तिन्ही जागा महायुती जिंकेलच पण रत्नागिरी जिल्हयातील सर्व जागा मिळवून पुर्ण शास्वत अशा बहुमताने पुन्हा एकदा राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होईल असा दावाही भांडारी यांनी केला.
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर शुक्रवारी राजापूरात आलेल्या भांडारी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राजापूर विधानसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांच्या रूपाने एक काम करणारा उमेदवार जनतेला दिलेला आहे. त्यामुळे आपल्या रखडलेल्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी राजापूर मतदार संघातील जनता भरघोस मतांनी सामंत विजयी करून आपल्या हक्काचा आमदार म्हणून विधानसभेत पाठवतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राज्यातील महाविकास आघाडीच्या सत्ता काळात राज्यात अपेक्षित विकास झाला नाही. गुंतवणूक वाढली नाही, उलट गुंतवणूकदारांनीच राज्यातुन काढता पाय घेतला होता परिणामी औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्र पिछाडीवर गेला. विकास कामांना विरोध करण्याचे काम महाविकास आघाडीने केले. मात्र त्यानंतर महायुतीचे शासन आले आणि मागील सव्वा दोन वर्षात विकासाची घोडदौड सुरू झाली. आमच्या शासनाने अनेक लोकाभिमुख योजना सुरू केल्या. व यशस्वीपणे राबवल्या आहेत. औद्योगिक क्षेत्रात पिछाडीवर पडलेला महाराष्ट्र पुन्हा एक नंबर वर आणला. राज्यात थेट गुंतवणूक वाढली असे भांडारी यांनी सांगितले. ही निवडणूक प्रगती का विकासाला विरोध अशी बनली असून राज्यातील सुज्ञ जनता प्रगतीच्या बाजुने असून ती महायुतीला साथ देत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार असा दावाही त्यांनी केला. भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था देशातील सर्वात मोठी बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला
राजापूर विधानसभा मतदारसंघात मागील पंधरा वर्षात सक्षम नेतृत्व नसल्याने हा मतदारसंघ विकासाच्या बाबतीत मागास राहिला आहे. मात्र ती कसर भरून काढण्यासाठी व विकासाला गती देण्यासाठी महायुतीने किरण सामंत यांच्यासारखा तडफदारपणे काम करणारा उमेदवाद दिला आहे. या मतदारसंघातील मतदारांना विकासाची जाण असलेला लोकप्रतिनिधी निवडून देण्याची संधी आली आहे. येथील मतदार निश्चितच किरण सामंत यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहातील असा विश्वास व्यक्त करताना सामंत यांच्या विजयासाठी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकसंघपणे काम करत असल्याचे भांडारी यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला महायुतीचे उमेदवार किरण सामंत, भाजपचे तालुकाध्यक्ष सुरेश गुरव, ओबीसी सेलचे प्रदेश सचिव अनिल कुमार करंगुटकर, ऋषीकेश केळकर, सौ.शितल पटले, स्वप्नील गोठणकर, अमजद बोरकर आदी उपस्थित होते.