सावंतवाडी पोलिसांत तक्रार दाखल
सावंतवाडी । प्रतिनिधी : मतदान कोणाला करणार असा सवाल करत शहरातील एका प्राध्यापकाला धक्काबुक्की झाल्याचा प्रकार सावंतवाडीत घडला आहे. एका ‘अपक्ष’ उमेदवाराच्या समर्थकाकडून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. सदरचे प्राध्यापक एका राजकीय संघटनेचे समर्थक आहेत असे सांगत त्या समर्थकांकडून प्राध्यापकास अश्लील शिविगाळ केल्याची घटना सावंतवाडीत घडली. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला.
संबंधित प्राध्यापक निवडणूक सेवेत कार्यरत असून
जिल्ह्यातील एका मतदान केंद्राची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. शुक्रवारी रात्री ते घरी आल्यानंतर त्यांच्या घराबाहेर हा प्रकार घडला. याबाबत संबंधित प्राध्यापकाने पोलिसांत तक्रार दिली असून संबंधिता विरोधात बदल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे त्यांच्या निवासस्थानानजिक वाड्यातील मित्रांशी बोलत असताना यातील अपक्ष उमेदवारांच्या समर्थकांनी तुम्ही मत कोणाला घालणार असे विचारले. त्यावेळी एकाने ते उबाठा गटाचे कित्येक वर्षे समर्थक असल्यामुळे ते आमच्या उमेदवाराला मत घालणार नाहीत असे म्हणून त्यांना शिवीगाळी केली. तर त्यातील एकाने मारहाण करण्याचा प्रयत्न केला. तसेच अंगावर येवुन तुम्हाला महागात पडेल अशी धमकी दिली. प्राध्यापकाच्या शर्टची कॉलर पकडुन ओढत नेवुन गाडीवर ढकलुन दिले. त्यानंतर पोलीसात तक्रार कर, माझे कोणीही वाकड करू शकत नाही व पुढील परीणामास तयार रहा अशी धमकी दिली.
याबाबत सावंतवाडी पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित हे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. या प्रकाराचा सर्वस्तरातून निषेध नोंदविला जात आहे. याबाबतची तक्रार संबंधिताकडून देण्यात आली असून पोलिसांना याबाबत विचारले असता त्यांनी दुजोरा दिला आहे. मात्र, हे प्रकरण सामंजस्याने मिटवण्यात आल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.










