राज्यस्तरीय शालेय मैदानी स्पर्धा संपन्न

 

रत्नागिरी :- राज्यस्तरीय शालेय मैदानी (१४,१७,१९ वर्षा आतील मुली) स्पर्धेचे आयोजन एस.व्हि.जे.सी.टी.क्रीडा संकुल, डेरवण येथे 09 ते 11 नोव्हेंबर या कालावधीत करण्यात आले होते. स्पर्धेमध्ये राज्यातील नागपूर, मुंबई, पुणे, लातूर, छत्रपती संभाजी नगर, अमरावती, नाशिक, क्रीडा प्रबोधिनी, कोल्हापूर असे नऊ विभागातील 36 जिल्ह्यातून अंदाजे 1 हजार 71 खेळाडूंनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेमध्ये राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू सहभागी असल्याने उत्तम खेळाचे प्रदर्शन प्रेक्षकांना अनुभवता आले.

 

 

स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी उपसंचालक क्रीडा व युवक सेवा संचालनालय संजय सबनीस, उपसंचालक कोल्हापूर
विभाग माणिक पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे, क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर, रत्नागिरी जिल्हा
अॅथलेटिक्स असोसिएशनचे संदिप तावडे, क्रीडा अधिकारी अक्षय मारकड, गणेश जगताप, राज्य क्रीडा मार्गदर्शक
सचिन मांडवकर, गणेश खैरमोडे, कनिष्ठ लिपिक प्रणित कांबळे व स्पर्धेसाठी उपस्थित निवड समितीमध्ये गणेश जाधव, पूनम नवगिरे, बळवंत बाबर, सिमा पाटील, अविनाश पाटील, पारस पाटील, कय्युम शेख, हर्षल निकम आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय शिंदे यांनी केले.

 

 

श्री. सबनीस यांनी विद्यार्थ्यांना आधुनिक सिंथेटिक ट्रॅकचा फायदा घेऊन सतत आपली कामगिरी उंचावण्याबाबत संबोधित केले. श्री. पाटील यांनी खेळ आणि त्या संबंधित शासकीय प्रोत्साहनपर योजना याबाबतचे महत्व स्पष्ट करून खेळाडूंना संबोधित केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राज्य क्रीडा मार्गदर्शक गणेश खैरमोडे यांनी केले. एस.व्हि.जे.सी.टी. क्रीडा संकुलातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 400 मीटर सिंथेटिक ट्रॅकचा फायदा आमच्या
खेळाडूंची कामगिरी उंचावण्यास कारणीभूत ठरल्याचेही मत प्रशिक्षकांनी व्यक्त केले. एस.व्हि.जे.सी.टी. क्रीडा संकुला
मध्येच खेळाडूंची उत्तम निवास भोजन व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केल्यामुळे मुलींच्या सुरक्षिततेबाबत आम्ही
निर्धास्त होतो, असेही पालकांनी आवर्जून सांगितले.

स्पर्धेतील विजयी खेळाडूंना मेडल व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रत्येक इव्हेंट मधील प्रविण्य प्राप्त
पहिल्या दोन क्रमांकाच्या विजेत्या खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.