आंबोली । प्रतिनिधी :
आंबोली नांगरतास फाटा येथून सुमारे २०० मीटर अंतरावर असलेल्या एका ओढ्यामध्ये एका अज्ञात पुरुषाने झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास उघडकीस आली. याबाबतची खबर त्या ठिकाणी गुरे राखण्यासाठी गेलेल्या एका इसमाने स्थानिक रेस्क्यू टीमचे मायकल डिसूजा राजू राऊळ तसेच अजित नार्वेकर यांना दिली.
यानंतर रेस्क्यू टीमचे सदस्य आंबोली पोलिसांना घेऊन घटनास्थळी पोहोचले असता पांढऱ्या नायलॉन दोरीने अंदाजे वय ४० ते ४५ असलेल्या एका अज्ञात इसमाने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली असल्याचे निष्पन्न झाले. ही घटना चार ते पाच दिवसांपूर्वीची असल्याने मृतदेह पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत होता. मृतदेहाच्या अंगावर निळा शर्ट व काळी पॅन्ट असल्याचे सांगण्यात आले.
तर शेजारीच असलेल्या विवो कंपनीच्या मोबाईल मध्ये सिमकार्ड नसल्याचे लक्षात आले. तसेच कपड्याने भरलेली एक काळी बॅग सुद्धा त्या ठिकाणी आढळून आले आंबोली पोलीस दत्तात्रय देसाई मनीष शिंदे अभिषेक कांबळे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व आजूबाजूला सुद्धा कोणत्या गोष्टी आढळतात का याबाबत तपासणी केली. परंतु तसे काही आढळून आले नाही. यावरून हि आत्महत्या असल्याचे प्रथमदर्शी लक्षात येत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याबाबत अधिक तपास आंबोली पोलीस करत असून मृतदेह शवविच्छेदनासाठी शुक्रवारी सकाळी आणण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.










