सोनुर्ली श्री देवी माऊलीचा उद्या वार्षिक जत्रोत्सव

जत्रोत्सवाची तयारी पूर्ण : प्रशासन सज्ज

सावंतवाडी । प्रतिनिधी : दक्षिण कोकणचे प्रतिपंढरपूर म्हणून ख्याती पावलेल्या व लोटांगणाची जत्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोनुर्ली श्रीदेवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव शनिवार १६ नोव्हेंबर रोजी प्रतिवर्षीप्रमाणे उत्साहात साजरा होणार आहे.
सोनुर्ली देवी माऊलीचा वार्षिक लोटांगण जत्रोत्सव शनिवारी पार पडत आहे. जत्रोत्सवाची सर्व तयारी युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आली आहे.
सद्यस्थितीत मंदिराभोवती मंडप उभारण्याचे काम सुरू असून भाविक भक्तांना देवीचे दर्शन सुलभ रीत्या घेता यावे यासाठी नियोजन करण्यात आले आहे. तसेच मंदिर परिसरातील सुशोभीकरण तसेच इतर सर्व कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. मंदिराकडे जाणाऱ्या दोन्ही बाजूच्या रस्त्यावरील झाडेझुडपे साफ करून रस्ता वाहतूकही सुरळीत करण्यात आलेली आहे.
पोलिस प्रशासनाकडूनही देवस्थान कमिटीशी चर्चा करण्यात आली असून जत्रोत्सवाला होणारी गर्दी लक्षात घेता योग्य नियोजन करण्याची ग्वाही देण्यात आली आहे. याबाबत पोलिस यंत्रणेकडून मंदिर परिसर तसेच मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांची पाहणीही केली आहे. मंदिर परिसरामध्ये दुकाने लावण्यासाठी मंडप तसेच इतर आखणी व्यावसायिकांकडून करण्यात आली आहे.
भाविकांना सोनुर्ली येथे दर्शनासाठी जाण्यासाठी सुलभ व्हावे यासाठी एसटी प्रशासनाने ही विशेष बस गाड्यांची व्यवस्था केली आहे. तसेच खाजगी वाहनांसाठी सोनुर्ली मंदिराच्या काही अंतरावर दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. एकूणच जत्रोत्सवाची उत्सुकता शिगेला पोचली असून जत्रोत्सव उत्साहात आणि सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनासह देवस्थान कमिटी सज्ज झाली आहे.