नाट्यगृहाला पुन्हा सौंदर्य तुम्हीच प्राप्त करून देऊ शकता!

मामा वरेरकर नाट्यगृह समस्यांबाबत कलावंतांनी वेधले खा. नारायण राणे यांचे लक्ष

मालवण | प्रतिनिधी : मालवणच नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात अग्रगण्य असलेले मालवण शहरातील मामा वरेरकर नाट्यगृह नादुरुस्त बनले आहे. गेले अनेक महिने विविध समस्यांनी ग्रस्त आहे. नाट्यगृहाचे कलेचे सौंदर्य तुम्हीच प्राप्त करून देऊ शकता. असे सांगत मालवण येथील रंगकर्मी व कलावंत यांच्या वतीने अ. भा. मराठी नाट्यपरिषद मालवणचे कार्यवाह संजय शिंदे यांच्या वतीने खा. नारायण राणे यांना निवेदन देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, आपल्या प्रयत्नाने निर्माण झालेल्या आणि आपल्या शुभहस्ते उद्घाटन झालेल्या व गेली कित्येक वर्षे केवळ मालवणच्याच नव्हे तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हयातील सांस्कृतिक क्षेत्रात अग्रगण्य असलेले मामा वरेरकर नाटयगृह गेले काही महिने विविध समस्यांनी ग्रासलेले आहे.नाटयगृहाच्या रंगमंचाला अनेक ठिकाणी वाळवी लागली आहे, व पावसाळयात रंगमंचावरील छत गळतीही सुरू असते. नाटयगृहातील प्रेक्षागृहाच्या अनेक खुर्च्या मोडलेल्या आहेत. नाटयगृहात पुरेसे प्रकाश योजना साहित्य उपलब्ध नाही. मेकअप रूम व बाहेतील कॉरीडोर मधील दरवाजे मोडले आहेत. नाट्यगृहामधील सध्याची एसी व्यवस्था योग्य नसून सेंटराईज एसी व्यवस्था आवश्यक आहे.

दादा, आपणांस तमाम रंगकर्मी व कलाकारांच्यावतीने कळकळीची विनंती आहे की, आपण याबाबत जातीने लक्ष घालून आपले नाट्यगृह पूर्वीप्रमाणे अद्ययावत करावे. आणि हे फक्त आपणच करू शकता असा आम्हाला विश्वास आहे. असे निवेदनात म्हटले आहे.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मालवण अध्यक्ष प्रकाश कुशे, कार्यवाह संजय शिंदे, बुवा भालचंद्र केळुसकर, भाजपा ओबीसी सेल महिला अध्यक्ष पुजा वेरलकर, युवती सेना जिल्हा प्रमुख सोनाली पाटकर, शिवसेना माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर, समीर शिंदे, गजानन मांजरेकर, गणेश मेस्त्री तसेच रंगकर्मी व कलावंत यांच्या वतीने काही दिवसांपूर्वी एक मिटिंग घेऊन नाट्यगृह समस्या बाबत खा. नारायण राणे यांना निवेदन देण्याचे निश्चित कारण्यात आले. त्यानुसार संजय शिंदे, पुजा वेरलकर, किसन मांजरेकर, सोनाली पाटकर यांनी खा. नारायण राणे यांना निवेदन दिले. यावेळी सौ. निलमताई राणे याही उपस्थित होत्या.