चोख पोलीस बंदोबस्त
किती वाढेल मतदानाची टक्केवारी? उत्सुकता वाढली
रत्नागिरी : अनघा निकम- मगदूम
विधानसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघात 1747 मतदान केंद्र असून 13 लाख 39 हजार 697 मतदारांची नोंदणी झाली आहे. जिल्ह्यात नवतरुणांसह वृध्द मतदारांची संख्याही मोठी आहे. प्रशासनाने जास्तीत मतदान व्हावे यासाठी अगदी ग्रामीण भागापर्यंत मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
बुधवारी सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाचा हक्क मतदारांना बजावता येणार आहे. जिल्ह्यात 1747 विधानसभा मतदान केंद्र असून यात दापोलीत 392, गुहागर 322, चिपळूण 336, रत्नागिरी 352, राजापूर 345 मतदान केंद्र आहेत. यातील शहरीभागात 184 तर ग्रामीण भागात 1563 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे.
दापोलीमध्ये 2 लाख 91 हजार 297 मतदार असून यात 1 लाख 39 हजार 895 पुरुष तर 1 लाख 51 हजार 402 महिला मतदार आहेत. तर रिंगणामध्ये 9 उमेदवार असून त्यामध्ये अबगुल संतोष सोनू – महाराष्ट्र नवनिर्माण सेना ( रेल्वे इंजिन), कदम योगेशदादा रामदास – शिवसेना (धनुष्यबाण), कदम संजय वसंत – शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) ( मशाल), मर्चंडे प्रविण सहदेव – बहुजन समाज पार्टी (हत्ती) , कदम योगेश रामदास – अपक्ष (हिरा), कदम योगेश विठ्ठल – अपक्ष (विजेचा खांब), कदम संजय सिताराम – अपक्ष (चिमणी), कदम संजय संभाजी – अपक्ष (शिट्टी) आणि खांबे ज्ञानदेव रामचंद्र- अपक्ष (बासरी) उमेदवार आहेत.
गुहागर विधानसभा मतदार संघात 2 लाख 42 हजार 704 एकूण मतदार असून त्यात 1 लाख 15 हजार 511 पुरुष तर 1 लाख 27 हजार 193 महिला मतदार आहेत. रिंगणामध्ये 7 उमेदवार असून त्यामध्ये गांधी प्रमोद सिताराम – महाराष्ट्र नवनिर्माण सेना (रेल्वे इंजिन), जाधव भास्कर भाऊराव- शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) (मशाल), बेंडल राजेश रामचंद्र- शिवसेना ( धनुष्यबाण), प्रमोद परशुराम आंब्रे – राष्ट्रीय समाज पक्ष (ऑटो रिक्षा), फडकले संदीप हरी – अपक्ष (बॅट), मोहन रामचंद्र पवार – अपक्ष (शिट्टी), सुनिल सखाराम जाधव – अपक्ष ( अंगठी) उमेदवार आहेत.
चिपळूण मतदार संघात 1 लाख 34 हजार 883 पुरुष तर 1 लाख 41 हजार 183 महिला असे 2 लाख 76 हजार 66 एकूण मतदार आहेत. रिंगणामध्ये 6 उमेदवार असून त्यामध्ये प्रशांत बबन यादव – नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार (तुतारी वाजवणारा माणूस), शेखर गोविंदराव निकम- नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी (घड्याळ), सौ. अनघा राजेश कांगणे – अपक्ष (शिट्टी), प्रशांत भगवान यादव- अपक्ष (ट्रम्पेट), महेंद्र जयराम पवार – अपक्ष ( माईक), – शेखर गंगाराम निकम- अपक्ष (फूलकोबी) हे उमेदवार रिंगणात आहेत.
रत्नागिरी मतदार संघात 1 लाख 42 हजार 48 पुरुष तर 1 लाख 49 हजार 162 महिला अशा 2 लाख 91 हजार 221 एकुण मतदार आहेत. रत्नागिरी विधानसभा मतदार संघात 11 तृतीयपंथी मतदार आहेत. रिंगणामध्ये 8 उमेदवार असून त्यामध्ये उदय रविंद्र सामंत – शिवसेना ( धनुष्यबाण), बाळ माने – शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) ( मशाल), भारत सिताराम पवार – बहुजन समाज पार्टी ( हत्ती), कैस नुरमहमद फणसोपकर- अपक्ष- (वाळुचे घड्याळ), कोमल किशोर तोडणकर – अपक्ष ( संगणक), ज्योतीप्रभा प्रभाकर पाटील – अपक्ष ( काडेपेटी), दिलीप काशिनाथ यादव -अपक्ष ( इस्त्री), पंकज प्रताप तोडणकर -अपक्ष ( बॅट) उमेदवार रिंगणात आहेत.
राजापूर मतदार संघात 2 लाख 38 हजार 409 एकूण मतदार असून यात 1 लाख 13 हजार 839 पुरुष तर 1 लाख 24 हजार 570 महिला मतदार आहेत. तर रिंगणामध्ये 8 उमेदवार असून त्यामध्ये किरण रविंद्र सामंत – शिवसेना ( धनुष्यबाण), जाधव संदिप विश्राम – बहुजन समाज पार्टी ( हत्ती), राजन प्रभाकर साळवी – शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) (मशाल), अमृत अनंत तांबडे – अपक्ष ( चिमणी), अविनाश शांताराम लाड – अपक्ष (शिट्टी), यशवंत रामचंद्र हर्याण – अपक्ष (चालण्याची काठी), राजेंद्र रविंद्रनाथ साळवी – अपक्ष ( बॅटरी टॉर्च), संजय आत्माराम यादव – अपक्ष (फणस) उमेदवार रिंगणात आहेत.
जिल्ह्यात 24 हजार 589 नवमतदार असून ते प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामुळे नवतरुणांमध्ये बुधवारी होणार्या मतदानाबाबत उत्साह दिसत आहे. जिल्ह्यात शंभर वयावरील 394 मतदारांची नोंद प्रशासनाने केली आहे. यातही 110 वर्षापेक्षा अधिक वयाची एक महिला मतदाराची नोंद करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात 7 हजार 201 दिव्यांग उमेदवारांची नोंद आहे. सर्वाधिक दिव्यांग उमेदवारांची नोंद चिपळूणमध्ये आहे.
जिल्ह्यात 13 लाख 39 हजार 697 एकूण मतदार असून यात पुरुष मतदार 6 लाख 46 हजार 176 आहेत. तर 6 लाख 93 हजार 510 इतक्या महिला मतदार आहेत. पाच विधानसभा मतदार संघात मिळून 47 हजारहून अधिक महिला मतदार आहेत. प्रत्येक मतदार संघात आठ ते अकरा हजार इतक्या महिला अधिक आहेत. त्यामुळे पाचही ठिकाणी महिलाच उमेदवारांचे भविष्य ठरवणार आहेत.
जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त सुद्धा चोख ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यात १२३ अधिकारी कार्यरत असून १३५४ पोलीस अंमलदार, १०५० बाहेरील अंमलदार, १६०० होमगार्ड आहेत. ४ केंद्रीय सशस्त्र दल, २ राज्य राखीव दल, सर्व्हीलंसचे २१ अधिकारी आणि १५ भरारी पथके जिल्ह्यात बंदोबस्ताला नेमण्यात आली आहेत.











