शेतकऱ्याचे सुमारे ७० हजारांचे नुकसान
वीज वितरणच्या कारभारावर ग्रामस्थांची नाराजी
सावंतवाडी । प्रतिनिधी : विद्युत भारित ११ केव्ही लाईन तुटून अंगावर पडल्याने सेहवाल जातीची एक दुभती गाय जागीच गतप्राण झाली. शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मळगाव रेडकर वाडी येथे ही घटना घडली. या दुर्दैवी घटनेत शेतकरी गोपाळ सदाशिव सातार्डेकर यांचे अंदाजे सत्तर हजार रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच त्वरित वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी गोपाळ सातार्डेकर हे नेहमीप्रमाणे संध्याकाळी तीन गाईंना नजीकच्या शेतात चारण्यासाठी घेऊन गेले होते. याचवेळी त्या भागातून गेलेली ११ केव्हीची उच्च दाबाची विद्युत वाहिनी तुटून खाली असलेल्या एलटी लाईनवर पडली. दुर्दैवाने, त्याच ठिकाणी चरत असलेल्या सेहवाल जातीच्या एका गाईला तुटलेल्या ११ केव्ही लाईनचा स्पर्श झाला. ११ केव्ही लाईनचा विद्युत प्रवाह एलटी लाईनमधून प्रवाहित झाल्याने, शेतकरी गोपाळ सातार्डेकर यांच्या डोळ्यादेखत ती गाय तडफडून मृत्यू पावली. सुदैवाने, श्री. सातार्डेकर आणि त्यांच्या अन्य दोन गायी घटनास्थळापासून थोड्या लांब असल्याने मोठा अनर्थ टळला आणि त्यांची जीवितहानी टळली.
शेतकरी गोपाळ सातार्डेकर यांनी अलीकडेच शासकीय योजनेतून दुग्ध व्यवसायासाठी सेहवाल जातीच्या तीन गाई घेतल्या होत्या. यापैकी प्रत्येक गाय तब्बल ७० हजार रुपयांची असल्याचे सांगितले जाते. आजच्या घटनेत त्यांची एक मौल्यवान गाय दगावल्याने त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
ही घटना घडताच श्री. सातार्डेकर यांनी प्रसंगावधान राखत त्वरित याची माहिती ग्रामस्थांना दिली. ग्रामस्थांनी तातडीने सरपंच हनुमंत पेडणेकर यांना कल्पना दिली. सरपंच पेडणेकर यांनीही तात्काळ वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून वीजपुरवठा खंडित करण्याची मागणी केली. त्यांच्या सूचनेनुसार, त्वरित विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला.
या घटनेनंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनाही त्या ठिकाणी बोलावून मृत गाईचा पंचनामा करण्यात आला. यावेळी महावितरणचे उप अभियंता राक्षे शैलेश राक्षे तसेच महावितरणचे अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या दुर्दैवी घटनेबाबत ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त करण्यात आली असून, वीज वितरण कंपनीच्या कारभाराबाबतही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
या गंभीर प्रकाराबद्दल वीज वितरण कंपनीने जबाबदारी स्वीकारून संबंधित शेतकऱ्याला तात्काळ नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी यावेळी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी केली आहे. वीज वितरण कंपनीने तुटलेल्या तारांची त्वरित दुरुस्ती करावी आणि भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी योग्य उपाययोजना करावी, अशी अपेक्षाही ग्रामस्थांनी व्यक्त केली.












