चिपळूण : येथील शासकीय धान्याची चाेरी हाेत असल्याची बाब उघड झाली असून, तब्बल ७०० किलो धान्य चोरल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी संशयित म्हणून रमाकांत मोरे (रा. शिरळ) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत ट्रक चालक कैलास शंकर सावंत (रा. देवरूख) यांनी पोलिस स्थानकात याबाबत फिर्याद दिली आहे. चार दिवसांपूर्वी रत्नागिरीहून रेशनचे धान्य भरलेला ट्रक चिपळुणात दाखल झाला होता. मात्र, चालकाची तब्येत बिघडल्याने हा ट्रक चिपळूण पेठमाप येथे एका सोसायटीच्या गोडाऊनजवळ उभा होता. याचा फायदा घेत रमाकांत मोरे याने या ट्रकमधील ५० किलोची १४ पोती लांबविली. त्याची किंमत १७,५०० रुपये इतकी आहे.
याप्रकरणी चिपळूण पोलिस स्थानकात फिर्याद दाखल होताच रमाकांत मोरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









