चिपळूण-संगमेश्वरमध्ये कडवी लढत; महायुतीचे शेखर निकम विजयी

महायुतीचा जल्लोष; फटाक्यांची आतषबाजी, जयघोषाने चिपळूण दणाणले!

 

चिपळूण (संतोष सावर्डेकर):— चिपळूण- संगमेश्वर विधानसभा निवडणुकीच्या अटीतटीच्या लढतीत महायुतीचे उमेदवार शेखर निकम यांनी महाविकास आघाडीचे प्रशांत यादव यांचा ६ हजार ८६७ इतक्या मतांनी पराभव करीत विजय मिळवला. निकम यांनी ९६ हजार ५५५ तर यादव यांनी ८९ हजार ६८८ इतकी मते मिळवित दोघांमध्ये कडवी लढत झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. पहिल्या फेरीपासून यादव यांनी १२ व्या फेरीपर्यंत मताधिक्य मिळवले होते. मात्र, नंतर निकम यांनी मतांची आघाडी मिळवली ती शेवटच्या २४ व्या फेरीपर्यंत कायम ठेवत आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले. यानंतर महायुतीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करीत विजयोत्सव साजरा केला. यामुळे शेखर निकम यांच्या विजयाचा गुलाल, फटाक्यांची आतषबाजी, डीजेच्या दणदणाटाने चिपळूण दणाणले. एकंदरीत महायुतीच्या गोटात आनंदाचे वातावरण पसरले होते. चिपळूणमधून अपेक्षित मताधिक्य मिळाले नसले तरी देवरुखने तारले! अशी प्रतिक्रिया विजयी उमेदवार शेखर निकम यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.

चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील एकूण ३३६ मतदान केंद्रावर दिनांक २० रोजी ६९.४% इतके मतदान झाले. या मतदारसंघात २ लाख ७६ हजार ६६ मतदार असून त्यापैकी १ लाख ९० हजार ५९२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. गत निवडणुकीपेक्षा सुमारे ५ टक्के मतदान वाढल्याची नोंद झाली आहे. यामुळे ही वाढलेली मते कोणाच्या पारड्यात जाणार ? तसेच कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. तर नामसाधर्म्य उमेदवार किती मते खेचणार? याकडे देखील लक्ष लागून राहिले होते.

दिनांक २३ रोजी सकाळी ८ वाजता कडक बंदोबस्तात येथील युनायटेड इंग्लिश स्कुलच्या गुरुदक्षिणा सभागृहात मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीतच महाविकास आघाडीचे प्रशांत यादव यांनी २७८ मतांची आघाडी घेत गोटात आशेचा किरण निर्माण केला. ही आघाडी १२ व्या फेरीपर्यंत ९३७ मतांच्या आघाडीने कायम राहिली. मात्र, यादव व निकम यांच्यात आघाडीसाठी कांटे की टक्कर पहायला मिळाली. नंतर १३ व्या फेरीत शेखर निकम यांनी ३३ मतांची जी आघाडी घेतली. यानंतर ती आघाडी शेवटच्या २४ व्या फेरीपर्यंत कायम राहिली. ही आघाडी निकम यांना सावर्डे गटापासून सुरुवात झाली. ती संगमेश्वर-देवरुखच्या शेवटच्या टोकापर्यंत कायम राहिली. यामध्ये शेखर निकम यांना पोस्टल मतांसह ९६ हजार ५५५ तर प्रशांत यादव यांना ८९ हजार ६८८ इतकी मते मिळाली. एकंदरीत निकम यांचा ६ हजार ८६७ इतक्या मतांनी विजय झाला आहे.

अपक्ष उमेदवार यांना पोस्टल मतांसह अनघा कांगणे यांना ९३७, प्रशांत भगवान यादव १०५१, महेंद्र पवार ३६८, शेखर गंगाराम निकम १ हजार ६१३ मते तर नोटाला २ हजार ३२० मिळाली आहेत.

यानंतर महायुतीचे उमेदवार शेखर निकम यांना निवडणूक अधिकाऱ्यांनी विजयी घोषित केले. तसे प्रमाणपत्र निकम यांना देण्यात आले.

महायुतीचा जल्लोष

शेखर निकम विजयी झाल्याचे समोर आल्यानंतर महायुतीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी केली. ‘कोण आला रे… कोण आला…सह्याद्रीचा वाघ आला…! अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडण्यात आला. यावेळी विजयी मिरवणूक मतमोजणी केंद्राजवळून काढून ती संपूर्ण शहरातून काढून चिपळूण शहर दणाणून सोडले. यामुळे महायुतीच्या गोटात आनंदाचे वातावरण पहावयास मिळाले. यावेळी शिवसेना उपनेते, माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्यासह महायुतीचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

चौकट

निसटता असला तरी विजय महत्वाचा; आम्ही आत्मचिंतन करू-शेखर निकममहायुतीचे विजयी उमेदवार शेखर निकम यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की आपला विजय हा आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे सांगून गेला. आपण काम करीत राहतो. मात्र, निवडणूक नुसत्या कामांवर होत नाही. थोडे जागरूकतेने व व्यूहरचना आखण्याची गरज आहे. आपण सरळ मार्गाने जातो. यामुळे आपल्याला वाटलं होतं की जी आपण कामे केलेली आहेत. यामुळे चिपळूण तालुका भरभरून देईल, असे वाटले होते. मात्र, देवरुख मधल्या छोट्या- छोट्या कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत आपल्या विजयाच्या मदतीला आली. विजय हा विजय असतो. त्यामुळे आपण आनंदी आहेच. परंतु, ज्या पद्धतीने चिपळूणमध्ये काम केलं होतं तेव्हा अपेक्षित तेवढे यश मिळाले नसले तरी यामध्ये कोणालाही दोष देणार नाही. सावर्डेमध्ये ज्या लोकांसाठी दिवस- रात्र काम करतो. तेव्हा अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही, याची थोडी खंत आहे. तरीही देवरूख तालुक्याने ती कसर भरून काढली आहे. चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनती बद्दल आपण सर्वांना धन्यवाद देतो, अशा शब्दात आपली भावना महायुतीचे नवनिर्वाचित उमेदवार शेखर निकम यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. निवडणुकीत विषारी प्रचार करण्यात आला. हा निवडणुकीचा भाग असतो. मात्र, हा विजय आत्मचिंतन करणारा लावणारा आहे. येत्या पाच वर्षात खूप चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न राहील. ही निवडणूक सोपी नव्हती सकाळच्या सत्रात दादांना ‘सॉरी’ म्हटलं होतं. आपण मतदारसंघाच्या विकासासाठी निधी दिला.परंतु बहुतेक काय अडचणी येईल,असं वाटलं होतं. परंतु, देवरुखवासीयांनी भरभरून साथ दिल्यामुळे आपल्या विजयाचा मार्ग सुकर झाला. पुढील काळात महायुती अभेद्य ठेवण्याचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करू, अशी ग्वाही शेखर निकम यांनी यावेळी दिली.