रत्नागिरी : दररोज अनेक रस्ते अपघात होतात. त्यामधील बहुसंख्य अपघात वाहनचालकांना रात्री अंधारात रस्त्यातील गुरे न दिसल्यामुळे झालेले आहेत. या घटनांमध्ये वाहनचालकांसह गुरेही जायबंदी होतात.
हे प्रकार टाळण्यासाठी मोकाट गुरांच्या गळ्यात रेडियम बेल्ट बांधण्याचा उपक्रम रत्नागिरीतील सहा तरुणांनी हाती घेतला आहे. आतापर्यंत १०० मोकाट गुरांच्या गळ्यात रेडियम बेल्ट बांधण्यात त्यांना यश आले आहे. गोसेवा महासेवा मानून ते हे काम करत आहेत.
रत्नागिरी शहरातील एका कपड्याच्या दुकानात काम करणाऱ्या तरुणांनी गोसेवा महासेवा मानून सेवाभावी कार्य हाती घेतले आहे. त्यात अनुप सिंह, सूर्यवीर सिंह, वने सिंह, हिम्मत सिंह, प्रकाश कुमार, प्रवीण कुमार या तरुणांचा समावेश आहे. हे सर्व तरुण दुकानातील काम संपल्यानंतर रात्री या कार्यासाठी बाहेर पडतात.











