रत्नागिरी विधानसभेत उबाठाची मोठी पिछेहाट; अनेक हक्काच्या गटात महायुतीची सरशी 

 

 

 

रत्नागिरी : रत्नागिरी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे विजयी उमेदवार उदय सामंत आणि महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार बाळ माने यांना केंद्रनिहाय मिळालेल्या मतांचा विचार केल्यास बहुसंख्य अल्पसंख्यांक समाज आघाडीच्या बाजूने राहिला. त्याला जयगड केंद्र अपवाद आहे. रत्नागिरी शहरातील अल्पसंख्यांकांची काही मते वळवण्यात सामंत यशस्वी ठरले आहेत. ग्रामीण भागात उबाठाचे वर्चस्व असलेल्या केंद्रांवर उदय सामंतांचा प्रभाव राहिला. तसेच उबाठाचे तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांच्या मालगुंडमध्येही सामंतांनाच पसंती मिळाली.

उदय सामंत यांनी या गटातील जयगड केंद्रापासूनच मताधिक्याने सुरवात झाली. या केंद्रावर ४२० मते सामंतांना तर अवघी ८६ मते माने यांना मिळाली. जयगड अल्पसंख्यांक समाज मात्र सामंत यांच्या मागे उभा राहिला. तिथे साखरमोहल्ल्यातील केंद्रावर २३६ मते सामंतांना मिळाली तेथे माने यांना अवघी ८४ मते आहेत. नांदिवडे, संदखोलमध्ये सामंतांनी मताधिक्य घेतले. कासारीत मात्र बाळ मानेंना अधिक मते मिळाली. जांभारी, चाफे, कांबळे लावगण, वाटद, रिळमध्ये सामंत यांची सरशी झाली. गडनरळ, कळझोंडी, वरवडे, वरवडे खारवीवाडा येथे सामंतांना मोठे मताधिक्य मिळाले आहे.

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांच्या मालगुंड येथील केंद्रांवरही त्यांचे उमेदवार बाळ माने पिछाडीवर आहेत. सामंत यांना येथे चांगले मतदान झाले आहे. डावखोल, कोंड्ये, आगवे केंद्रावर सामंतांनी मोठ्या फरकाने आघाडी घेतली. ओरी, माचिवले, पोचरी केंद्रावरही सामंत आघाडीवर आहेत. भाजपची ताकद असलेल्या कोतवड्यात सामंत यांना चांगले मतदान झाले. त्यामुळे भाजप सामंतांच्या मागे उभा राहिला, हे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. आंबेडबुद्रुक केंद्रावरच माने आघाडीवर आहेत. वेतोशी, पिरंदवणे, करबुडे, जांभरूण केंद्रावर सामंतांनी जोरदार मुसंडी मागली. भोके, कोंड शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबू म्हाप यांच्या जिल्हा परिषद गट असलेल्या मिरजोळ्यात सामंत यांना चांगले मताधिक्य मिळाले आहे. महायुतीचे उमेदवार बाळ माने यांच्या होमपिचवरच सामंत यांना त्यांच्या तोडीची मते मिळवण्यात यश आले. रत्नागिरी शहरालगत असलेल्या नाचणे शांतीनगर भागात देखील सामंत यांना चांगले मतदान झाले. नाचणे कोकणनगर, कोकणनगर झोपडपट्टी या भागात मात्र बाळ माने यांना चांगली मते मिळाली. उदय सामंत या केंद्रावर पिछाडीवर राहिले. शहरातील निवखोल, कर्ला, राजीवडा, शिवखोल, मिरकरवाडा, सोमेश्वर आदी अल्पसंख्यांक समाज असलेल्या भागात बाळ मानेंना मताधिक्य आहे.

 

सामंत यांच्या पाली होमपिचवर सामंतांनी मोठी आघाडी घेतली. उबाठा शिवसेनेचे वर्चस्व असलेले हरचेरी, तोणदे उदय सामंत यांचाच करिष्मा चालला. उबाठाचे डावललेले निष्ठावंत उदय बने हे तटस्थ राहिल्यामुळे त्यांच्या निरूळ, चांदोर, पावस, कसोप, वायंगणी, गोळपमध्येही चांगली मते मिळवली. त्यामुळे तालुक्यावर वर्चस्व असलेल्या उबाठाला सामंत यांनी या निडणुकीत मोठा धक्का दिला.