चिपळूण :- आजच्या आधुनिक युगात यशस्वी होण्यासाठी प्रभावीपणे संवाद साधने आवश्यक आहे. विविध संवाद कौशल्य आत्मसात करून व्यक्ती कोणत्याही क्षेत्रात यशस्वी वाटचाल करू शकतो. प्रभावीपणे संवाद साधण्याची कला अवगत असलेल्या व्यक्ती केवळ आपल्या समाजालाच नाही तर संपूर्ण जग जिंकू शकतो असे मत प्रा. रिजंट परेरा यांनी व्यक्त केले. डी.बी.जे. कनिष्ठ महाविद्यालय, चिपळूणच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दिनांक २८ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत मौजे चिंचघरी (गणेशवाडी) येथे संपन्न होत असलेल्या ग्रामीण पुनर्रचना निवासी शिबिरात ‘प्रभावी संवाद कौशल्य’ या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
प्रा.परेरा यांनी आपल्या व्याख्यानाच्या सुरुवातीलाच संवादाची व्याख्या सांगून संवाद साधण्याच्या विविध पद्धती उदाहरणासह स्पष्ट केल्या. संवादासाठी माध्यमाची आवश्यकता असून प्रभावी संवादासाठी नियंत्रण,स्पष्टता, आत्मविश्वास व इतरांच्या मतांचा आदर करणे आवश्यक असते असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
त्यानंतर त्यांनी संप्रेषणामध्ये येणाऱ्या अडथळ्यांची सविस्तर माहिती रंजक उदाहरणसह विद्यार्थ्यांना दिली. विद्यार्थ्यांनी सदरच्या व्याख्यानास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक अरुण जाधव, सहकार्यक्रमाधिकारी प्रा. विठ्ठल कोकणी, प्रा.प्रदीप वळवी,राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सल्लागार प्रा. विनायक बांद्रे, प्रा.सौ स्वरदा कुलकर्णी, प्रा.श्रीमती सुचेता दामले व ग्रामस्थ उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. रिया खराडे यांनी, प्रमुख वक्त्यांचा परिचय कु. सक्षम जाधव यांनी तर आभार प्रदर्शन, कु.वेदांत बांद्रे यांनी केले











