माणसाला साहित्यच जिवन जगण्याचे बळ देते : साहित्यिका प्रा. माधुरी शानभाग

 

वेंगुर्ला तालुका त्रैवार्षिक चौथ्या मराठी साहित्य संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

वेंगुर्ले : दाजी नाईक : लेखनाच्या प्रवासाचे निश्चित वय असे काही नसते. लेखन करताना सगळ्यात पहिली पायरी येते ती वाचन. वयात आल्यावर जर माणसाला कविता करावीशी वाटत नाही किंवा कविता म्हणावीशी वाटत नसेल तर तो माणूस नाही कारण माणसामध्ये साहित्य दडलेले असते. साहित्य पंढरीची वाटचाल माणसाने स्वतःमधील कविता कथा निबंध अशा साहित्यिक माध्यमातून व्यक्त होऊन केली पाहिजे. कारण साहित्यच जिवन जगण्याचे बळ देते, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिका प्रा.माधुरी शानभाग यांनी वेंगुर्ले येथे जयवंत दळवी नगरीत बोलताना केले.

 

आनंदयात्री वाङ्मय मंडळ, वेंगुर्ला आयोजित आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस, बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ला, किरात ट्रस्ट वेंगुर्ला आणि को. म. सा. प. सिंधुदुर्ग जिल्हा शाखा यांच्या सहयोगाने वेंगुर्ला तालुका त्रैवार्षिक चौथे मराठी साहित्य संमेलन २०२४ येथील साई मंगल कार्यालयातील जयवंत दळवी नगरीत आयोजित केले होते. या संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिका प्रा. माधुरी शानभाग यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर मंडळाच्या अध्यक्षा तथा लेखिका सौ. वृंदा कांबळी, प्रमुख पाहुणे प्रा. पी.के.पाटील, स्वागताध्यक्ष प्रशासकीय अधिकारी श्री. विजू गावडे, वेंगुर्ले नगरपरिषदेचे मुख्याधिकारी परीतोश कंकाळ, खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम बी चौगुले, कोमसापचे जिल्हाध्यक्ष मंगेश मसके, किरात ट्रस्ट चे सुनील मराठे, वेताळ प्रतिष्ठानचे विवेक तिरोडकर, सातेरी प्रासादिक मंडळाचे राजाराम नाईक यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वैभव खानोलकर यांनी तर आभार नि.प्रा. आनंद बांदेकर यांनी मानले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते आनंदयात्री साहित्य गौरव पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.