वेंगुर्ले : प्रतिनिधी : धनगर समाजातील असंतोषाला वाचा फोडण्यासाठी आणि समाजाला न्याय मिळऊन देण्यासाठी धनगर समाजीतील कार्यकर्ते माऊली हळणकर, दिपक बो-हाडे, यशवंत गायके,विजय तमनर, गणेश केसकर, योगेश धरम हे पंढरपूर येथे गेले १५ दिवस आमरण उपोषण करत आहेत. या आंदोलनाला धनगर समाज विचारमंच सिंधुदुर्ग चे अध्यक्ष एकनाथ जानकर, उपाध्यक्ष देवू जंगले, रामचंद्र झोरे, बळीराम कोकरे व पदाधिका-यांनी आंदोलनाला भेट देवून सिंधुदुर्गातील सकल धनगर समाजाने या उपोषणकर्त्यांना पाठिंबा दिला आहे.
संविधानाताल अनुसुचित जमातींच्या यादीतील 36 व्या क्रमांकावर धनगड या जातीचा उल्लेख आहे. धनगड नावाची जात संपूर्ण देशात अस्तित्वात नसून धनगर हेच धनगड आहेत. परंतू गेली 75 वर्षे धनगर समाज अनुसूचित जमातीच्या आरक्षणापासून वंचित राहिला आहे. गेली अनेक वर्षे अनुसुचित जमातीच्या आपल्या हक्काच्या आरक्षणाच्या सवलती लागू करण्यासाठी धनगर समाजाची आग्रही मागणी असूनही आरक्षणाच्या सवलती लागू होत नाहीत. मागील काही वर्षात शिक्षित समाजाच्या हा अन्याय लक्षात आल्यानंतर अनेक आंदोलने, मोर्चे, उपोषणे करूनही सरकारने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे हे आंदोलन सुरू आहे.











