सोलापूर येथील पर्यटक गंभीर जखमी : मालवण वायरी तारकर्ली मार्गांवरील घटना
मालवण | प्रतिनिधी : तारकर्लीच्या दिशेने जाणारी मोटारसायकल व समोरून येणारा टेम्पो यांच्यात झालेल्या अपघातात मोहोळ सोलापूर येथील एक पर्यटक जखमी गंभीर झाला. तर त्याची पत्नीही जखमी झाली आहेत. हा अपघात गुरुवारी दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास वायरी भूतनाथ देवाची पाणंद येथील रस्त्याच्या वळणावर घडला.
दरम्यान, अपघातात गंभीर जखमी झालेल्या त्या पर्यटकास ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात, हलवण्यात आले आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहिती नुसार मोहोळ सोलापूर येथील एक पर्यटक दांपत्य दुचाकी (एम. एच. १३ सीआर – ७८३७) ने पर्यटनासाठी मालवणात आले होते. दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान ते तारकर्लीच्या दिशेने जात असता वायरी भूतनाथ येथील रस्त्यावर समोरून मालवणच्या दिशेने येणारा टेम्पोला यांच्यात धडक बसली.
या अपघातात पर्यटक रस्त्यावर पडल्याने त्याच्या डोक्यास, हातास, पायास गंभीर दुखापत झाली तर त्याची पत्नीही जखमी झाली. या अपघाताची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते. गंभीर जखमी झालेल्या त्या पर्यटकाला रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथून त्याला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. गंभीर जखमी पर्यटकाचे नाव समजू शकले नाही. अधिक माहिती घेण्याची कार्यवाही पोलीस प्रशासनाकडून सुरु होती.












