रेल्वे दुहेरीकरणासाठी राज्य अर्थसंकल्पात तरतूद करा

अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे रेल्वे बोर्डाला निवेदन
 खेड(प्रतिनिधी) कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण करून रत्नागिरी विभाग मध्य रेल्वेत समाविष्ट करण्याच्यादृष्टीने कोकण रेल्वे महामंडळातील महाराष्ट्राचे समभाग केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या स्वाधीन करावेत, अशी मागणी करत कोकण रेल्वे दुहेरीकरणासाठी राज्य अर्थसंकल्पात तरतूद करा, अशा मागण्यांचे निवेदन अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे सचिव अक्षय महापदी यांनी रेल्वे बोर्डासह केंद्रीय मंत्र्यांना दिले आहे.
रोहा-वीर दुहेरीकरणानंतर रेल्वे बोर्डाने कोकण रेल्वेच्या १४७.६८ कि.मी. मार्गाचा टप्पा दुहेरीकरणासह २१ नवीन स्थानके बांधण्याच्या प्रस्तावाला मान्यता देऊन यासाठी लागणारा ४४६० कोटींचा निधी ५० टक्के समभाग आणि ५० टक्के कर्जाच्या रूपात उभा करण्याचे निश्चित करण्यात आले होते. हा प्रस्तावदेखील केंद्रीय अर्थमंत्रालयाकडे पाठवण्यात आला होता. संबंधित राज्य शासनाकडून निधी देण्याची लेखी हमीची मागणीदेखील करण्यात आली होती.
भारतीय रेल्वेत आधुनिकीकरण व क्रांती सुरू असताना कोकण मात्र त्यापासून वंचितच आहे. कोकण रेल्वे भारतीय रेल्वेचा भाग नसून स्वतंत्र महामंडळ असल्यामुळे हे घडत आहे. केंद्रीय अर्थसंकल्पातूनही कोकण रेल्वेला निधी मिळत नाही. पायाभूत सुविधांच्या सुधारणांसाठी लागणाऱ्या निधीकरिता राज्य शासन बाहेरील कर्जावरच अवलंबून राहते.
कोकण रेल्वे महामंडळाचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण करण्याआधी ही कंपनी १०० टक्के मालकी हक्कांसहीत केंद्र शासनाच्या अखत्यारित येणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित राज्य शासनाने त्यांचे समभाग केंद्रीय रेल्वेमंत्र्यांच्या स्वाधीन करायला हवेत. या बाबीचा व प्रवाशांच्या हिताचा विचार करून कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण करण्यात यावे. तसेच रत्नागिरी विभाग मध्य रेल्वेला व कारवार विभाग नैर्ऋत्य रेल्वेला जोडण्यासाठी अधिकारात प्रयत्न करण्याची आर्जवही करण्यात आली आहे.