लांजा (प्रतिनिधी) शहरातील सहकारी क्षेत्रातील अग्रगण्य पतसंस्था असलेल्या कुणबी विकास सहकारी पतसंस्था लांजाला राज्यस्तरीय ” बँको ब्ल्यू रिबन २०२४ ” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात ज्या सहकारी पतसंस्थांनी आपल्या कार्यक्षेत्रात अत्यंत उत्कृष्ट कार्य केले आहे. अशा सहकारी पतसंस्थाना अविज पब्लिकेशन , कोल्हापूर व गॅलेक्सी इनमा , पुणे यांचे संयुक्त विद्यमाने दरवर्षी बँको ब्ल्यू रिबन पुरस्काराचे आयोजन केले जाते.
सन २०२४ या वर्षासाठी बँको ब्ल्यू रिबन पुरस्कारासाठी संस्थेची आर्थिक स्थिती , व्यवस्थापन , आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर , व्यवसाय वाढीसाठी केलेल्या नविन योजना इ. बाबत संपूर्ण माहितीच्या आधारे तज्ञ निवड समितीने केलेल्या मूल्यांकनानुसार नागरी पतसंस्था ठेवी रु. ५० ते ६० कोटीपर्यंत या विभागामध्ये सलग सातव्या वर्षी राज्यस्तरीय द्वितीय क्रमांकाचा ” बँको ब्ल्यु रिबन ” या पुरस्कारासाठी कुणबी विकास सहकारी पतसंस्था मर्या लांजा या पतसंस्थेची निवड करणेत आली होती.
दि.२९ जानेवारी रोजी लोणावळा येथे ॲडव्हान्टेज २०२५ या राज्यस्तरीय सहकार परिषदेमध्ये राज्यस्तरीय ” बँको ब्ल्यू रिबन पुरस्कार कुणबी विकास सहकारी पतसंस्था मर्या. लांजा या पतसंस्थेला माजी सहकार आयुक्त, पुणे चंद्रकात दळवी यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार
संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत परवडी, संचालक नंदकुमार आंबेकर व मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप डाफळे यांनी स्विकारला. यावेळी संस्थेच्या सभासद सौ. निलांबरी परवडी व सौ. स्नेहल आंबेकर या उपस्थित होत्या.
या पुरस्काराबद्दल संस्थेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे












