सावंतवाडी । प्रतिनिधी : दिव्यांग व्यक्तींना हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल) मोफत उपलब्ध करुन देण्याच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी १० फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळाकडून करण्यात आले आहे.
सन २०२४-२५ करिता दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने ही योजना लागू करण्यास १० जून २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे तसेच सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या परिवार, कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे हे या योजनेचे उद्देश आहेत.
या योजनेचा लाभ मिळण्यासाठी https://register.mshfdc.co.in हे नाव नोंदणी पोर्टल सुरू करण्यात आले असून दिव्यांग व्यक्तींनी त्यावर ऑनलाईन अर्ज करावेत. अधिकाधिक दिव्यांग व्यक्तींनी योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय-आंबेडकर भवन सिंधुदुर्ग नगरीं, सिंधुदुर्ग येथे संपर्क साधावा, असेही महामंडळाचे सिंधुदुर्ग जिल्हा व्यवस्थापक यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.
फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून अंतिम तारीख १० फेब्रुवारी दुपारी १२ वाजेपर्यंत आहे. इच्छुक लाभार्थिंनी लवकरात लवकर फॉर्म भरुन लाभ द्यावा तसंच शासनाने दिव्यांग बांधवांना चांगल्या दर्जाची ई व्हेईकल उपलब्ध करून देण्यात द्यावी, असे आवाहन साहस प्रतिष्ठान, सिंधुदुर्गच्या संस्थापक,अध्यक्षा
रुपाली पाटील यांनी केले आहे.










