सीएसएमटी फलाट विस्तारीकरण कामाचा परिणाम, इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी कसरत
खेड(प्रतिनिधी)सीएसएमटी मुंबई रेल्वेस्थानकातील फलाट क्रमांक १२ व १३ च्या विस्तारीकरणाचे काम रेल्वे प्रशासनाने हाती घेतले आहे. या कामामुळे तेजससह जनशताब्दी एक्स्प्रेस दादर स्थानकापर्यंत तर मंगळूर-सीएसएमटी एक्सप्रेस ठाणे स्थानकापर्यंत धावत असून याचा फटका कोकणातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना बसत आहे. २८ फेब्रुवारीपर्यंत प्रवाशांना इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी कसरतच करावी लागणार आहे.
नोव्हेंबर २०२४ अखेरपर्यंत पायाभूत सुविधांची कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट मध्य रेल्वे प्रशासनाने ठेवले होते. मात्र, ही कामे नियोजित वेळेत पूर्ण न झाल्याने फलाट विस्तारीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. सीएसएमटी मुंबई स्थानकातील फलाट क्रमांक १२ व १३ च्या विस्तारीकरण कामामुळे ३ एक्सप्रेस गाड्यांच्या प्रवाशांना फटका बसत आहे. जनशताब्दी व तेजस एक्सप्रेस सीएसएमटी स्थानकाऐवजी दादर स्थानकापर्यंतच धावत असल्याने प्रवाशांची वाताहतच सुरू आहे.
मध्य रेल्वेवरील सीएसएमटी स्थानकातील क्रमांक १० ते १३ च्या विस्तारीकरणासाठी २०१५-१६ मध्ये ६२.१२ कोटी रुपयांच्या खर्चाच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर फलाटाची लांबी ३०५ मीटर ते ३८५ मीटरपर्यंत वाढवण्याचे काम हाती घेण्यात आले. फलाट क्रमांक १० व ११ च्या विस्तारीकरणाचे काम जून २०२४ मध्ये पूर्ण झाले असून येथून २४ डब्यांच्या रेल्वेगाड्या धावणार आहेत.
सद्यस्थितीत फलाट क्रमांक ११ व १३च्या विस्तारिकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. फलाट क्रमांक १२ व १३ ची लांबी ३८५ मीटर असून ही लांबी ६९० मीटरपर्यंत वाढवण्यात येणार आहे. विस्तारीकरणाच्या कामाला वेगही देण्यात आला असून ही कामे फेब्रुवारीअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष मध्य रेल्वेने डोळ्यासमोर ठेवले आहे. या फलाटांच्या विस्तारीकरणाची कामे पूर्ण झाल्यानंतर ६ ते ८ रेल्वेगाड्यांच्या डब्यात वाढ देखील होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.










