वेंगुर्ले : दाजी नाईक
वायंगणी समुद्रकिनाऱ्यावर या हंगामात पहिल्यांदा आँलिव्ह रिडले जातीच्या कासवाच्या घरट्यातून (विणीतून) ९९ पिल्ले बाहेर पडली. या सर्व पिल्लांना कासव मित्र यांनी कांदळवन अधिकारी कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थांच्या उपस्थितीत सागरी नैसर्गिक अधिवासात सोडून जीवदान दिले. वायंगणी किनाऱ्यावर आतापर्यंत सुमारे ७० ऑलिव्ह रिडले कासवांनी अंडी लावलेली आहेत. या कासव विणीचा प्रजनन केंद्र म्हणून असलेल्या भागात या ७० विणींचे संरक्षण कासव मित्र सुहास तोरस्कर हे करत आहेत.
वायंगणी किनाऱ्यावर स्थानिक ग्रामस्थ चंदू मोर्जे यांना अडगळीच्या ठिकाणी ऑलिव्ह रिडले कासवाची अंडी आढळून आली. त्याने कासवमित्र सुहास तोरस्कर यांना ते ठिकाण दाखवले. श्री. तोरस्कर यांनी ती प्रजनन केंद्र येथे आणून संरक्षित केली होती. या १०८ अंड्यांपैकी ९९ अंड्यातून आज कासवाची पिल्ले बाहेर पडली. सर्व कासव पिल्ल्यांना एकत्र ठेवत सुहास तोरसकर यांनी वन विभाग व कांदळवन विभाग यांना कासवाची पहिली बॅच वांयगणी किनाऱ्यावरून बाहेर पडत असल्याचे कल्पना दिली. त्यानुसार कांदळ विभागाचे अधिकारी राज दीपक तेली, दत्ता रामराव मुकाडे, दीपक कांबळी, नयन घडशी, शुभम कांबळे आदी अधिकारी कर्मचारी वायंगणी किनाऱ्यावर दाखल झाले. स्थानिक कासव मित्र सुहास तोरस्कर तसेच स्थानिक नागरिक चंदू मोर्जे, संतोष साळगावकर, सुरज तोरस्कर, संजय तोरस्कर, निलेश पेडणेकर, कोल्हापूरचे योमा फाटक आदींच्या उपस्थितीत त्या पिल्लांना सागरी नैसर्गिक अधिवासात सोडून नवे जीवदान देण्यात आले.











