रत्नागिरी : स्तोत्र गायन, योग प्रात्यक्षिके, नाट्यशास्त्र विभागातर्फे सादरीकरण अशा सांस्कृतिक कार्यक्रमाने क्षेत्रिय वैदिक संमेलनाची रंगत वाढली. झाडगाव येथील माधवराव मुळ्ये भवनात तीन दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. उज्जैन येथील महर्षि सान्दीपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठान आणि रामटेक येथील कविकुलगुरू संस्कृत विश्वविद्यालयाचे रत्नागिरी उपकेंद्राच्या वतीने या संमेलनाचे आयोजन केले होते.
पहिल्या दिवशी युवा गायक श्रीधर पाटणकर यांचा गायनसंध्या कार्यक्रम रंगला. नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय या सुमधुर सस्वर स्तोत्राने त्यांनी सुरवात केली. संस्कृती आणि संस्कृतशी निगडित गीतांचे त्यांनी सादरीकरण केले. प्रथमेश शहाणे यांच्या तबल्याचा नाद, पुष्कर सरपोतदार यांची पखवाजाची थाप व संतोष आठवले यांच्या संवादिनीचा सूर या तिघांच्या मिलाफाने गायक श्रीधर पाटणकर यांनी गायलेल्या ‘स्वामी कृपा कधी करणार’ या भैरवीने मनाचा ठाव घेतला.
योग विभागातील बीए आणि एमए योगशास्त्र या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी वतीने योग प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. प्रात्यक्षिकाचे संयोजन प्रा. अक्षय माळी यांनी केले. गोगटे- जोगळेकर महाविद्यालयातील संस्कृत विभागाच्या विद्यार्थिनींनी गणेश गीत गायन व त्यावर नृत्य केले.
नाट्यशास्त्र विभागातील चिन्मय जोशी यांनी हिंदीतील गणेश वंदना, गोंधळ गीत सादर केले. तेजस्विनी जोशी हिने एकपात्री गांधारी (हिंदी) सादर केले. इतिहासावर आधारित ‘उत्तरक्रिया’ नाटकातील व्यक्तिरेखा रुची पाष्टे हिने लीलया साकारली. नटसम्राटमधील व्यक्तिरेखा व एकपात्री अंतू बर्वा नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. शशांक पाटील यांनी उत्कृष्टपणे सादर केले. प्रबोधनपर काव्यवाचन तेजस्विनी जोशी यांनी सादर केले. महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रमाची सुरवात कैलास दामले यांच्या ढोलकीवादनाने झाली. जोगवा नृत्य रुची पाष्टे आणि भारुड बुरगुंडा होईल गं हे डॉ. पाटील यांनी सादर केले. विश्वविद्यालयाची विद्यार्थिनी गौरी मुळे यांनी संस्कृत एकपात्री सादर केले.
कार्यक्रमावेळी विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठी, रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे, निवृत्त प्रा. गणेश थिटे, प्रा. अंबरीष खरे आणि वैदिक पंडित, मान्यवर होते.












