“एक समृद्ध लोककला दशावतार” या पुस्तकाचे शानदार प्रकाशन
लेखक प्रा. वैभव खानोलकर यांच्यावर कौतुकांचा वर्षाव
वेंगुर्ले : दाजी नाईक :“एक समृद्ध लोककला दशावतार” या दशावतार लोक कलेवरच्या संशोधनात्मक पुस्तकाचे प्रकाशन वेंगुर्ले येथे संपन्न झालेल्या दुसऱ्या अखिल दशावतार नाट्य संमेलनात मोठ्या थाटात पार पडले. यावेळी प्रकाशन सोहळ्यात दैनिक प्रहार चे निवासी संपादक संतोष वायंगणकर यांनी वैभव खानोलकर यांनी केलेल्या संशोधनात्मक लिखाणाबद्दल कौतुक केले. वैभव खानोलकर यांचं खूप मोठं योगदान दशावतार लोककलेला आणि दशावतार कलावंतांना न्याय देण्यासाठी राहिलेला आहे, अशा भावना व्यक्त करताना ते सातत्याने दशावतार लोककले बरोबरच विविध विषयांवर लिखाण करत असतात त्यांच्या लिखाणातून वेगवेगळे विषय सातत्याने वाचायला मिळतात. विशेष म्हणजे भजन आणि दशावतार हे सिंधुदुर्गाच्या आवडत्या लोककला आहेत या दोन्ही विषयावर प्रहार च्या माध्यमातून मुलाखत सत्राचे आयोजन केले गेले या सगळ्या मुलाखत सत्राच्या मुलाखतकार म्हणून वैभव खानोलकर यांनी सातत्यपूर्ण मुलाखत घेतल्या याबद्दलही त्यांचे अभिनंदन. त्यांच्याकडून दशावतारासाठी जे लिखाण झालं ते भावी पिढीसाठी निश्चितपणे महत्त्वाचे कार्य ठरेल असेही त्यांनी सांगितले.
वेंगुर्ले येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात हा पुस्तक प्रकाशन सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर श्री. संतोष वायंगणकर यांच्यासह पुस्तकाचे लेखक प्रा. वैभव खानोलकर, संमेलनाध्यक्ष डाॅ.अशोक भाईडकर, ज्येष्ठ लेखिका सौ. वृंदा कांबळी, तरुण भारतचे आवृत्ती प्रमुख शेखर सामंत, देवदत्त परुळेकर, बुवा भालचंद्र केळुसकर, कलादान पुरस्कार विजेते जेष्ठ कलाकार यशवंत तेडोलकर, माजी समाज कल्याण सभापती अंकुश जाधव, गोवा येथील सप्तसूर चे संस्थापक विजय केरकर, न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विरेंद्र कामत आडारकर, रांगोळीकार रमेश नरसुले, एम.पी. मटकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.
*प्रा. खानोलकर यांचे पुस्तक दशावताराची उंची वाढवणारे : डाॅ.अशोक भाईडकर*
प्रा. वैभव खानोलकर यांनी आपल्या पुस्तकात विविध दाखल्यांचा आणि विविध पुराव्यांच्या आधार घेत दशावतार या मातीतील लोककला हे सिद्ध करत अनेक कानडीप्रेमी लोकांना जागा दाखवून दिली आहे. मी संशोधनात्मक करताना बाराव्या शतकापर्यंत अभ्यास केला पण खानोलकर मात्र ही लोककला सहाव्या शतकात असल्याचे पुरावे देतात माझ्या नंतरचे अत्यंत प्रभावी आणि दर्जेदारपणे त्यांनी केलेले लिखाण निश्चितपणे दशावताराची उंची वाढवणारे आहे असे मत संमेलनाध्यक्ष डाॅ.अशोक भाईडकर व्यक्त केले.
सतत विविध विषयांमध्ये लिखाण करणाऱ्या वैभव खानोलकर यांचे पुस्तक प्रकाशन करताना मला अभिमान वाटत आहे सातत्याने दशावतारी लोककलेबद्दल कलावंतांबद्दल त्यांनी केलेले लिखाण वेळोवेळी शासनाला वृत्तपत्रांतुन रोखठोक प्रश्न विचारले आहे.
यातून त्याच्यामध्ये या कलेविषयी असणारे आपलेपणा अनेकदा जाणवतो. स्वतः शिक्षक असून सुद्धा स्वतः मधला विद्यार्थी त्याने कधीच मरू दिला नाही वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करत असताना त्यांनी अनेक पदव्या मिळवल्या जवळपास नऊ पदव्या असणाऱ्या वैभव खांनोलकर यांनी दशावताराचे केलेले लिखाण निश्चितपणे दशावतारासाठी अभिमानाचा विषय आहे, असे शेखर सामंत यांनी सांगितले.
शिक्षक भारती संघटना एक समृद्ध लोककला दशावतार या पुस्तकाच्या वितरणासाठी कट्टीबध्द असल्याचे प्रशांत आडेलकर, अध्यक्ष शिक्षक भारती, सिंधुदुर्ग यांनी सांगितले. तसेच आम्ही शिक्षक भारती कडून राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांसाठी वैभव खानोलकर यांचे संशोधनात्मक पुस्तक यापुढे भेट म्हणून देऊ. जवळपास १०० ते १५० पुस्तके आम्ही आजच खरेदी करत आहोत असे जाहीर केले.
तर जेष्ठ लेखिका वृंदा कांबळी यांनी मनोगत व्यक्त करताना वैभव खानोलकर यांचे लिखाण नेहमीच प्रभावी आणि दर्जेदार असते त्याच्या लिखाणामध्ये सखोल अभ्यास असतो प्रत्येक विषयावर त्यांचा असणारा अभ्यास आणि त्यातून मनन चिंतन करत त्याने साधलेला समतोल हा निश्चितपणे त्यांच्या लिखाणातील प्रगल्भता दाखवते, दशावतार लोककलेवर फारशी पुस्तके उपलब्ध नाहीत वैभव खानोलकर यांनी एक समृद्ध लोककला दशावतार या पुस्तकाचे लिखाण करून दशावताराचा लोककलेचा खजिना उपलब्ध करून दिला लोककलेला समाजामध्ये खूप महत्त्व असते आणि अशा प्रकारचं दर्जेदार लिखाण त्या लोककलेची समृद्धता सिद्ध करते. ह्या लिखाणाबद्दल त्यांचे मनःपूर्वक कौतुक असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान वैभव खानावळकर यांचे हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर अनेक मान्यवरांनी त्यांना सदिच्छा व शुभेच्छा दिल्यात या कुडाळचे स्वरूप सावंत ,राजेश महाडेश्वर,बाबु जोशी आरोंदा, प्रसाद परब गोवा या सह दशावतारी कलावंत उदय राणे कोनस्कर.जानु वरख, दत्तप्रसाद शेणई, नारायण आसियेकर,अमित मोचेमाडकर, बाबा कामत, अनिल कामत, मयुर गवळी, हरेश नेमळेकर , पप्पू नांदोस्कर,महेश गंवडे, तुकाराम गावडे, ओमप्रकाश चव्हाण या सह अनेक कलावंतानी या पुस्तकाबद्दल प्रा.वैभव खानोलकर अभिनंदन केलं. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र मातोंडकर तर प्रास्ताविक प्रा. सचिन परुळकर यांनी केले.









