मळेवाड चराटकरवाडी येथील नदीत पात्रात मगरीचे दर्शन

न्हावेली । प्रतिनिधी : मळेवाड चराटकरवाडी, मुरकरवाडी व केरकरवाडी शेजारील नदी पात्रात सध्या वारंवार मगर दृष्टीस पडत आहे. या नदी पात्राला लागूनच येथील शेतकऱ्यांची शेती व बागबागायती असून येथील नदीत मगरीचे दर्शन होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सध्या नदीतील पाण्याचा साठा कमी झाल्याने ही मगर येथील मोठ्या दगडावर पहुडलेली दिसत आहे. काही काही वेळा तर ती नदीच्या बाहेरसुद्धा दृष्टीस पडत आहे.

स्थानिक शेतकरी तसेच ग्रामस्थांचा या नदीपात्राकडे सतत ये – जा असतो. तसेच येथील शेतकऱ्यांची गुरे सुद्धा या नदीकडे असतात. त्यामुळे एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, या मगरीच्या वास्तवामुळे येथील शेतकरी ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आहेत.
मागील महिन्यातच अशाच प्रकारे मळेवाड पुलानजीक भली मोठी मगर येथील ग्रामस्थांच्या दृष्टीस पडली होती. त्यामुळे वन विभागाने या मगरींचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.