लांजा न.पं.प्रभाग क्रमांक ९ मधील नागरिक त्रस्त
लांजा (प्रतिनिधी) मार्च एंडच्या पार्श्वभूमीवर लांजा नगरपंचायत पाणीपट्टी वसुलीसाठी ॲक्शन मोडवर असून एकीकडे पाणीपट्टी वसुली जोरदार सुरू असताना दुसरीकडे मात्र प्रभाग क्र.९ मध्ये नागरिकांची पाण्यासाठी बोंबाबोंब होत आहे. नगरपंचायतीला माहिती देवूनही याबाबत कार्यवाही केली जात नसल्याने नागरिकांमधून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.
मार्च एंडमुळे नगरपंचायतीने घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीसाठी तगादा लावला आहे. घरोघरी जाऊन नगरपंचायतीचे कर्मचारी वसुली करत आहेत. अशातच गेले काही दिवसांपासून वसुली सुरू असली तरी नागरिकांची पाण्या संदर्भात होत असलेल्या गैरसोयीकडे मात्र नगरपंचायतीच्यावतीने सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे.
नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्र.९ मध्ये साधारणतः एक महिन्यापासून पाण्याच्या संदर्भात तक्रारी आहेत. याबाबत नागरिकांच्यावतीने वेळोवेळी नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना कळविण्यात आले. परंतु करतो, बघतो, होईल.. अशी थातुरमातुर उत्तरांपलीकडे काही कारवाई होत नसल्याने नागरिकांमधून रोष व्यक्त केला जात आहे.
पाणीपट्टी कर नियमितपणे भरून देखील नागरिकांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. काही वेळेस तर पाणी खासगी स्वरूपात विकत घ्यावे लागत असल्याने त्याचा आर्थिक भुर्दंड देखील सर्व सामान्य नागरिकांना बसत असून पाणीपट्टी कर भरूनही नागरिकांच्या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याने नगरपंचायत प्रशासनाला जाब विचारण्याकरीता त्रस्त नागरिक नगरपंचायत कार्यालयावर धडक देणार असल्याचे बोलले जात आहे.












