राजापुरात रविवारी हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन

राजापूर (प्रतिनिधी): प्रतिवर्षापमाणे यावर्षीही राजापूर शहरात गुढी पाडव्याला हिंदू नववर्ष स्वागत काढण्यात येणार आहे. या नववर्ष स्वागत यात्रेच्या नियोजनासाठी सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या बैठकीत याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात आला. चैत्र शु. प्रतिपदा रविवार दि. ३० मार्च रोजी सकाळी ९.३० वाजता ग्रामदेवता श्री निनादेवी मंदिर राजापूर शोभायात्रेला प्रारंभ होणार आहे.

 

राजापूर शहरात गेली अनेक वर्षे हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती राजापूर यांचे वतीने वर्षप्रतिपदा गुढीपाडवा यादिवशी रितीरिवाजाप्रमाणे हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यासाठी हिंदू नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात येते. सालाबादप्रमाणे यावर्षीही हिंदू नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात येणार आहे. याची नियोजन बैठक सोमवारी राजापूरची ग्रामदेवता श्री निनादेवी मंदिर येथे पार पडली. या बैठकीत हिंदू नववर्षाचे स्वागत यात्रेत राजापूर शहरातील सर्व वाडीतील भजनी मंडळे, संप्रदाय, दिंडी यांनी सहभागी होण्यासाठी आवाहन पत्र देण्यात येणार आहे.

 

या दिंडीत धार्मिक, पौराणिक, ऐतिहासिक या विषयावर वेशभूषा करून काही मंडळी सहभागी होणार आहे. उत्सवाला अनुसरून सामाजिक संदेश देणारी पदयात्रा काढण्यात येणार आहे. विविध संघटना, मंडळे, संप्रदाय, संस्था, प्रतिष्ठाने यांनी या हिंदु नववर्ष स्वागत यात्रेत तन मन धन पूर्वक सहभागी होण्यासाठी आवाहन पत्र देण्याचे ठरले. ढोल पथक, लेझीम पथक, भजनी मंडळे यांनी या नववर्ष स्वागत यात्रेत सहभागी व्हावे. हिंदू धर्माचे प्रतीक म्हणून प्रत्येकाने आपल्या कपाळावर टिळक लावून पारंपारिक वेशामध्ये उपस्थित रहाण्याचे ठरविण्यात आले.

 

या बैठकीत उपस्थित हिंदू बंधू भगिनींनी हिंदू नववर्ष स्वागत यात्रा यशस्वी होण्यासाठी जबाबदारी वाटून घेतली. या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेत आपण सर्व हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन अध्यक्ष राजेंद्र कुशे यांनी केले आहे. या बैठकीला राजेंद्र कुशे, संदेश टिळेकर, महेश मयेकर, विनोद गादिकर, अभिजीत नार्वेकर, प्रसन्न देवस्थळी, रमेश गुणे, किरण शिवलकर, विवेक गुरव, सौ.सुयोगा जठार, शंकर सोलगावकर, दिलीप गोखले आदींसह राजापूर शहर व शहरालगत असलेल्या विविध भागातील हिंदू बांधव उपस्थित होते.