राज्यस्तरीय आमंत्रितांच्या रत्नागिरी कॅरम लीग सिझन ६ मध्ये पालघरच्या यंगस्टरने मारली बाजी

रत्नागिरी : उदय सामंत फाऊंडेशन व रत्नागिरी डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन आयोजित भारतीय आयुर्विमा महामंडळ, इंडियन ऑइल, इन्फिगो आय केअर, ओएनजीसी व पितांबरी प्रायोजित राज्यस्तरीय आमंत्रितांच्या रत्नागिरी कॅरम लीग सिझन ६ मध्ये पालघरच्या यंगस्टरने बाजी मारली. अंतिम फेरीत त्यांनी शिवगर्जना लायन्स संघाला अतिशय अटीतटीच्या सामन्यात २-१ अशी मात करून विजय मिळविला.

यंगस्टरने पहिल्या एकेरीच्या सामन्यात विश्व् विजेत्या संदीप दिवेने शिवगर्जना लायन्सच्या अहमद अली सय्यदवर २५-०, २५-५ अशी सहज मात केली. मात्र यंगस्टरच्या अमोल सावर्डेकर व सिद्धांत वाडवलकर जोडीला शिवगर्जना लायन्सच्या रियाझ अकबर अली व महम्मद घुफ्रान विरुद्ध ५-१५, १-२५ असे सहज पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे तिसरा व अंतिम मिश्र दुहेरीचा सामना निर्णायक ठरला. या सामन्यात यंगस्टरच्या जावेद शेख अंबिका हरिथ जोडीने शिवगर्जना लायन्सच्या प्रफुल मोरे व प्राजक्ता नारायणकर जोडीला ११-१२, १७-८ व १६-१५ असे शेवटच्या बोर्डात हरवून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. जैन सुप्रीमो संघाला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.