विनापरवाना आणि निर्दयपणे गुरे वाहतूक प्रकरणी दोघे ताब्यात

सावंतवाडी पोलिसांची आंबोली चेकपोस्टवर कारवाई : गुन्हा दाखल 

आंबोली । प्रतिनिधी : सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबोली चेकपोस्ट येथे आज पहाटे ३ च्या सुमारास पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत एका बोलेरो मॅक्सिट्रकमधून विनापरवाना आणि निर्दयपणे गुरे वाहतूक करणाऱ्या दोघांना ताब्यात घेण्यात आले.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबोली चेक पोस्ट येथे नाकाबंदी दरम्यान क्रमांकाच्या बोलेरो मॅक्सिट्रकची (एम. एच. १३ ए एक्स ७६७४ ) तपासणी केली असता, त्यात तीन गाई आणि त्यांची दोन वासरे कोंबून भरलेली आढळली. वाहतूक करणाऱ्या व्यक्तींकडे गुरांची वाहतूक करण्यासाठी कोणताही अधिकृत परवाना नव्हता. तसेच, जनावरांची अत्यंत दाटीवाटीने आणि निर्दयपणे वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले.

त्यामुळे याप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालक तात्या दत्तात्रय पाटील (वय ४५ वर्षे, रा. मारापुर, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) आणि तुकाराम विठोबा आनपट (वय ५४ वर्षे, रा. मारापुर, यादववाडी, ता. मंगळवेढा) या दोघांविरुद्ध प्राण्यांना निर्दयतेने वागवणे आणि विनापरवाना वाहतूक करणे या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मनीष शिंदे, राजेश नाईक, अभिजीत कांबळे, होमगार्ड बरागडे व पाटील यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.

पोलिसांनी अधिक माहिती देताना सांगितले की, जप्त केलेल्या गाई जरशी प्रजातीच्या असून त्या दुभत्या आहेत. गायी आणि वासरे यांची सुरक्षितता लक्षात घेता, त्यांना गोशाळेत ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिसांनी वाहतुकीसाठी वापरलेले वाहन जप्त केले असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत आणि कायदेशीर कारवाई लवकरच पूर्ण केली जाईल.

सदरची गुरे ही मालकीची व दुभती जनावरे होती. मात्र, विना परवाना वाहतूक व दाटीवाटीने गुरांना इजा होईल अशा पद्धतीने वाहतूक सुरू असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीसांनी दिली.