माखजनातील पाडव्याच्या जत्रेला भाविकांची अलोट गर्दी

पालखी नाचवण्याच्या सोहळ्याने शिमगोत्सवाची सांगता

 माखजन l वार्ताहर :     संगमेश्वर तालुक्यातील माखजन येथे प्रथेपरंपरेनुसार होणाऱ्या पाडव्याच्या जत्रेला भाविकांनी अलोट गर्दी केली होती.

शिमगोत्सवाच्या या शेवटच्या दिवशी ग्रामदेवतेची पालखी नाचवण्याचा सोहळा होतो.ग्रामदेवतेच्या मंदिराभोवती पालखी नाचवत पाच फेऱ्या मारल्या जातात.सनई,ढोल,ताशांच्या गजरात पालखी नाचवण्याचा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी आजूबाजूच्याच नव्हे तर जिल्हाभरातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात.यावेळी भाविकांनी श्री देव मानोबाचे देखील दर्शन घेतले.

या पालखी सोहळ्यावेळी युवा एकता प्रतिष्ठान रांजणेवाडी यांनी पारंपारिक पोशाख करत केलेले ढोलवादन लक्षवेधी ठरले.मंदिर परिसरात मोठी जत्रा भरली होती.माखजन ग्रामदेवतेची पालखी हौशीने आणि मोठ्या श्रद्धेने नाचवण्यासाठी आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ आवर्जून उपस्थित असतात.

पाडव्याच्या जत्रेनंतर उशिराने पालखी मंदिरात गेली.व शिंगोत्सवाची सांगता झाली.