बाबासाहेबांचा ‘हिरक’ महोत्सवी वाढदिवस कुठे साजरा केला होता ?

दुर्मिळ पत्र आले उजेडात 

घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिन विशेष

खेड । देवेंद्र जाधव :भारतीय घटनेचे शिल्पकार घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म म्हणजेच दिन पददलितांचा मुक्ती दिनच आहे. किंबहूना तो दिवस सर्व भारतीयांच्या जीवनातील एक महत्वपूर्ण अशी घटनाच आहे. त्यांच्या जन्मानेच अनेकांची कुळे तर उध्दारलीच मात्र अभिमानाचे जीवन देखील जगण्याचा आयाम प्राप्त करून देणारा तो दिवस… घटनाकार डॉ.आंबेडकर यांच्या हयातीत त्यांच्या चळवळीत खांद्याला खांदा लावून चळवळ जोमाने पुढे नेणारा खेड तालुक्याचे योगदान मोठे असून बाबा साहेबांच्या हयातीत खेड वासीयांनी हिरक महोत्सव साजरा केला होता.

 

घटनाकारांच्या हयातीत १९५२ साली बाबासाहेबांचा ६० वा हिरक महोत्सवी वाढदिवस साजरा केला होता. ती तारीख होती २३ एप्रिल १९५२. ही बाब एका दुर्मिळ पत्रकाद्वारे उघड झाली असून खेड तालुका बौध्द समाज सेवा संघाच्या वतीने प्रसिध्द झालेल्या ‘आमची पंच्याहत्तरी’ या स्मरणिकेच्या माध्यमातून या इतिहासावर प्रकाश पडला आहे त्यामुळेच खेड वासियांच्या सुवर्णमयी इतिहासाची पाने उलगडली गेली आहेत.

 

ज्या समाज व्यवस्थेने ज्यांना नाकारले, गाव कुसाबाहेर ठेवून हजारो वर्ष माणुस असुनही त्यांच्यावर अत्याचाराची परिसिमा करत बुरसटलेल्या धार्मिक बंधनाच्या चालीरितीमध्ये जखडून ठेवत हजारो वर्ष त्यांच्या पिढ्याच नासवल्या अशा मानव जातीला माणुसपण देणारे १४ एप्रिल १८९१ चे ते साल उजाडले. भारतीय घटनेचे शिल्पकार व जगाला वंदनीय ठरलेले डॉ. भिमराव रामजी आंबेडकर या बहुजनांच्या मुक्तीदात्याचा जन्म झाला. महू गावातील भीम जन्माची ती ‘कोवळी सकाळ’ अन त्या आश्वासक प्रकाश किरणाच्या सावलीत चार्तुवर्णाचे साखळदंड तटातट तुटले. अन बहुजनांना किंबहुना या भारत देशाला एक मुक्तीदाताच मिळून गेला. याच मुक्तीदात्याची त्यांच्या हयातीत जयंती साजरी करणारा खेड तालुका इतिह्साच्या बंद पानात गडप झाला होता.

 

१४ एप्रिल १८९१ याच दिवशी कोकणातील एका कोहिनूर हि-याचा झालेला जन्म अवघ्या देशाला तारूण गेला संविधानासारख्या पवित्र ग्रंथातून देशाला अंखड रूपात ठेवण्याचे महनिय कार्य या कोहीनुर हि-याने साध्य करून दाखवले आहे. म्हणूनच ‘‘चांदण्याची छाया… कापराची काया… माऊलीची माया होता माझा भिमराया ’’ अशी समर्पक शब्द ओळी घटनाकारांच्या बाबतीत सार्थ ठरतात

 

कोकणासारख्या ठिकाणी बाबासाहेबांनी केलेल्या दौºयांच्या माध्यमातून अनेक स्तरातील पददलित चळवळीत सहभागी झाले. त्यामुळेच १९५२ साली बाबासाहेबांचा हिरक महोत्सवी वाढदिवस साजरा करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले होते.तत्कालीन खेड तालुका विद्यार्थी वसतीगृह कमिटी मुंबई व खेड तालुका पंचायत कमिटी यांच्या वतीने शहरातील नवे म्युनिसीपल कार्यालय मामलेदार कचेरीसमोर हा वाढदिवस अवघ्या तालुक्यातील समाज बांधवांनी उत्सहाने साजरा केला होता. हा इतिहास गेली अनेक वर्षे इतिहासाच्या बंद पानात गडप झाला होता. रसाळगड खेड मधील अ‍ॅड. संतोष सावन्त यांनी या इतिहासाचा मागोवा घेत त्यांच्या हाती हे पत्र पडले अन त्यांनी या इतिहासाला पुन्हा ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्याचे काम आमची पंच्याहत्तरी या स्मरणिकेच्या माध्यमातून प्रसिद्ध करून इतिहासाच्या पाऊलखुणा किंबहुना गत स्मृती जन माणसा समोर मांडण्याचा प्रयत्न केला

 

१९५२ मध्ये घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीत साजरा केलेला कोकणातील तो पहिला वाढदिवस असावा अशी शक्यता देखील आहे. याच वाढदिवसा निमित्त पारंपरिक असलेली लेझीम, ढोल, ताशा, याच बरोबर खालू बाजा यासारख्या पारंपारिक वाद्यांच्या माध्यमातून घटनाकारांच्या प्रतिमेची मिरवणूक देखील काढण्यात आली होती.आजचे तरुण तरुणी बाबासाहेबांच्या विचारांचा अंगीकार करत आज विविध क्षेत्रात आपले अस्तित्व निर्माण करत आहेत. जो महिला वर्ग भीम जन्माच्या अगोदर शिक्षणापासून वंचित होता. किंबहुना तिने शिक्षण घेतले म्हणजे काही तरी विपरीत घडेल यांची ज्यांना ‘भीती’ होती त्यांना स्वत:च्या अस्मितेचा मार्ग करुन देणाºया बााबसाहेबांचे उपकार मोठे आहेत. त्यामुळे आजची महिला यशाच्या नभांगणात मुक्तपणे आपला मार्ग निवडत आहे. अनेक क्षेत्रात ‘महिलाराज’ आले आहे. ते केवळ बाबासाहेबांच्या कार्यकर्तृत्वामुळेच! त्या उत्सवात बाया बापड्या हि सहभागी झाल्या होत्या.

 

 

 

बाबासाहेबांच्या ‘शेडयुल कास्ट फेडरेशन’ या पक्षामधून निवडून आलेले खेड मधील आमदार भाऊ साहेब पाटणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. याच दिवशी येथील बांधवांनी त्या काळातील १ हजार ५०० रूपयांना साडेसहा गुठे जमिन विकत घेण्याचा संकल्प देखील या वाढदिवसानिमित्त पूर्ण केल्याची बाब दुर्मिळ पत्राच्या माध्यमातून उघड झाली आहे. त्यानंतर १९५४ मध्ये खेड तालुका बौध्द समाज सेवा संघ अस्तित्वात आला व इथूनच मोठया प्रमाणात संघटन मजबूती करणाचा निर्णय देखील घेण्यात आला.

 

 

 

कोकणाला दैदिप्य मान इतिहासाची परंपरा आजच्या मितीला कायम आहे.घटनाकारांच्या महत्वपूर्ण समाजप्रबोधन पर चळवळीत खेड तालुक्याचा मोठा सहभाग आहे. यामुळेच त्यांचा हिरक महोत्सवी साजरा केलेला वाढदिवस हि घटना देखील तत्कालीन चळवळीच्या दृष्टीने महत्वपूर्ण होती. त्यामुळेच घटनाकारांचे विचार आत्मसात करून अवघा कोकणातील जनसमूदाय एकत्र येत बाबासाहेबांच्या विचाराने भारावूनच गेला होता. त्यामुळे विशेषत: खेड मधील अनेक पदाधिकारी व कार्यक र्त्यांनी स्वत:ला या चळवळीत झोकून देत बाबासाहेबांची चळवळ गतीमान केली होती.