Income of eight lakh rupees to Lanja ST Agra from rounds for wedding ceremonies
१ ते २० मे या कालावधीत ६७ एसटी बस गाड्यांचे बुकिंग
एकूण १५ हजार ९४२ किमी चा केला गाड्यांनी प्रवास
लांजा (प्रतिनिधी) लग्न समारंभासाठी वापरण्यात येणाऱ्या ट्रक, खाजगी बस यासारख्या खासगी गाड्यातून होणाऱ्या धोकादायक प्रवासी वाहतुकीला पर्याय म्हणून लांजा एसटी आगाराने खास लग्न समारंभासाठी शासकीय दरात एसटी गाड्या उपलब्ध करून दिल्या होत्या. यामध्ये १ ते २० मे या कालावधीत एकूण ६७ एसटी बस गाड्यांचे बुकिंग करण्यात येऊन त्याद्वारे लांजा आगाराला ८ लाख ७६ हजार ८१० रुपयांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती आगारा मार्फत देण्यात आली.लग्नसराई म्हटली की सर्वांचीच धामधुम चालू असते. लग्नासारख्या या मंगल सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मग गावकऱ्यांची धावपळ असते. लग्नासाठी ग्रामीण भागात सर्रासपणे ट्रक किंवा अन्य खाजगी गाड्यांचा आधार घेतात. मात्र बऱ्याचदा अशा वाहनातून प्रवास करणे धोकादायक ठरते. हे लक्षात येऊन लांजा एसटी आगाराने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही देखील आपल्या नियमित फेऱ्यांवर ताण पडणार नाही याबाबतची खबरदारी घेऊन खास लग्न समारंभासाठी एसटी गाड्या उपलब्ध करून दिल्या होत्या.
यावर्षी मे महिन्यात लग्नाचे मूहूर्त सर्वाधिक असल्याने या महिन्यात लग्न समारंभासाठी गाड्यांचे आरक्षण झाले होते. त्यामध्ये १ ते २० मे या कालावधीत एकूण ६७ गाड्यांचे बुकिंग झालेले होते गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी लांजा एसटी आगाराने लग्न समारंभासाठी एसटी गाड्या उपलब्ध जास्त उपलब्ध करून दिल्याने आगाराच्या उत्पन्नात देखील वाढ झाली आहे. या बुकिंग झालेल्या ६७ एसटी बस गाड्यांनी १५९४२ किमी अंतर पार केले .या गाड्यांच्या माध्यमातून लांजा आगाराला आठ लाख ७६ हजार ८१० रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.











