पावसाळयात पूर आणि उन्हाळयात पाणीटंचाई राजापुरचे हे चित्र कोदवलीतील नवीन पर्यायी धरण बदलणार का?

नरेंद्र मोहिते | राजापूर : राजापूर शहराला ऐतिहासीक वारसा आहे. छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणून राजापूरकडे पाहिले जाते. इंग्रजांच्या वखारी राजापूरात पहावयास मिळतात आणि ब्रिटीशांच्या कुशाग्र बुध्दीमत्तेचे साक्ष देणारे कोदवली (सायबाचे धरण) धरणही राजापूरातच पहावयास मिळते. राजापूरी पंचे, राजापूरी हळद आणि खोबरे आणि राजापूरची गंगा ही देखील एक राजापूरची ओळख आहे. मात्र या राजापुरात पावसाळयात पूर पावसाळयात पूर आणि उन्हाळयात भिषण पाणीटंचाई.. अशी एक नवीन ओळख निर्माण झालेय.. मात्र ही राजापुरची अशी नवीन ओळख कुणालाही नकोय.. ती बदलायला हवी असं प्रत्येकाला वाटतयं.. या नवीन ओळखीमुळे राजापूरात राहयला नको रे बाबा.. असे शब्द कानी पडतात. कदाचित यामुळेच गेल्या दहा ते पंधरा वर्षात राजापूरच्या लोकसंख्येत वाढ झालेली नाही असे म्हटलं तरी वावगे ठरणार नाही. त्यामुळे आता कोदवली सायबाच्या धरणाच्या खालील बाजुस सुमारे १८ कोटी रूपये खर्चुन तयार होणारे नवीन पर्यायी धरण राजापूरची ही ओळख पुसणार काय? आणि राजापूरकरांना पुढील वर्षी पासून तरी २४ तास पाणी मिळणार काय? असा राजापूरकरांचा सवाल आहे.

 

कोदवली येथील ब्रीटीशकालीन सायबाच्या धरणाच्या खालील बाजुला पर्यानी नवीन धरण होणार आणि राजापूरकरांची पाणीटंचाई कायमची दूर होणार असे सांगितले जात आहे. मात्र प्रत्यक्षात यावर्षीही या धरणाचे काम पुर्ण झालेले नसल्याने यावर्षीही शहर वासीयांना तीव्र अशा पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. नगर परिषद प्रशासनाने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही १८ एप्रिल पासून एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. भविष्यात उपलब्ध पाण्याची पातळी आणखी खालावली तर मग ते दोन दिवस आड देखील होणार आहे. मात्र याला राजकिय दुरदृष्टीचा व नियोजनाचा अभाव हे जरी कारण असले तरी राजापूरकरांची एकूणच उदासिनताही राजापूरकरांच्या या पाणीच काय पण अन्य विकासात्मक प्रश्नांसाठी कारणीभूत आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

 

राजापूर शहराच्या एका बाजुला अर्जुना आणि कोदवली या दोन नद्या वाहतात आणि पुढे जैतापूर खाडीला मिळतात. तर श्री देव धोपेश्वर मंदिरा परिसरात वर्षाच्या बाराही महिने वाहणारी मृडाणी नदी आहे. अगदी चारही बाजुला राजापूरच्या पाणी म्हटले तर वावगे ठरणार नाही. पावसाळयात तर अर्जुना आणि कोदवलीला पूर आला की निम्मे राजापूर पाण्याखाली जाते. कधी कधी दोन ते तीन दिवस हे पुराचे पाणी राजापूरात तळ ठोकते. त्यामुळे पावसाळयात पूर आणि उन्हाळयात पाणीटंचाई अशी राजापूर शहराची परिस्थिती आहे. ज्या राजापूरात पूर येतो त्या राजापूरात मार्च, एप्रिल आणि मे मध्ये पाणीटंचाई असते असे कुणाला सांगितले तरी कुणी विश्वास ठेवणार नाही.

 

शहराच्या आजुबाजुला पाणी असताना राजापूर शहरात मात्र एप्रिल आणि मे या दोन महिन्यात भिषण अशी पाणीटंचाई निर्माण होते आणि शहर वासीयांच्या तोंडचे पाणीच पळते. कोदवली धरणात मार्च अखेरला ठणठणाट होतो आणि मग पावसाळयापर्यंत शिळ जॅकवेलकडी पाणीपुरवण्याचे आव्हान प्रशासनासमोर राहते आणि मग प्रशासनाकडून शहरवासीयांना एकदिवसाआड पाणी मिळू लागते. यावर्षी ते १६ एप्रिल पासून सुरू झाले आहे. राजापूर शहराला दोन पाणीपुरवठा स्त्रोत आहेत. एक कोदवलीतील सायबाचे धरण जे आता १४७ वर्षांचे झाले आहे, आणि शिळ जॅकवेल जी आता ३५ वर्षांची आहे. राजापूर शहरातील पाण्याची उपलब्धता, शहराच्या आजुबाजुने वाहणाऱ्या या नद्या आणि त्यातील पाणी, होणारा पाणीपुरवठा, पाणी योजना आणि त्यांचे नियोजन आणि या पाणीपुरवठयावर होणारा खर्च या एकूणच बाबींकडे नजर टाकली तर समोर पंचपक्वानांचे ताट आहे पण त्याचा आस्वाद घेता येत नाही अशी राजापुरकरांची परिस्थिती आहे.

 

सन १८७८ साली ब्रिटीशांनी शहराला नैसर्गिक रित्या पाणीपुरवठा करणारे कोदवली धरण बांधले. सन १८७८ ते सन १९९० पर्यंत या कोदवली धरणावरच अख्ख्या शहराचा पाणीपुरवठा अवलंबून होता. त्यानंतर सन १९९० मध्ये नगर परिषदेने शिळ जॅकवेलची निर्मिती केली आणि शहराला दोन पाणीपुरवठा स्त्रोत निर्माण झाले. या दोन पाणीपुरवठा स्त्रोतावर शहरातील सुमारे ११ हजार लोकसंख्येला पाणीपुरवठा केला जातो. ब्रिटीशांनी बांधलेले कोदवली धरण आता पुर्णपणे गाळात रूतलेय पण तरीही शहराला अगदी मार्च अखेर पर्यंत पाणी देतंय. या धरणातील गाळ आत्तापर्यंत अनेक वेळ उपसण्यात आला पण त्याचा काहीच उपयोग नाही. कारण दरवर्षी पावसात पुन्हा धरणात गाळ साचतो. तर शिळ जॅकवेलकडे अर्जुनेचे पाणी असेल तोपर्यंत ती पाणी देणार आहे.. कोदवलीचे पाणी नैसर्गिक रित्या अगदी एकही रूपया खर्च न होता शहरात येते. मात्र शहरापासून पाच ते सहा किलोमिटर दूर असलेल्या शिळ जॅकवेलकडून पाणी खेचणे म्हणजे प्रचंड खर्चिक. ५५ एचपीच्या दोन विद्युत पंपाने मार्च ते अगदी पावसाळा सुरू होईपर्यंत तालीमखाना साठवण टाकीकडे हे पाणी खेचावे लागते. त्यामुळे मोठया प्रमाणावर विजबीलाचा खर्च प्रशासनाला सोसावा लागतो. राजापूर नगर परिषदेचा पाणीपुरवठयावरिल खर्च उत्पन्नापेक्षा दुप्पट. सध्या पाणीपुरवठयावर पाणीपुरवठा देखभाल दुरूस्ती, साहित्य खरेदी, विज बील, कर्मचारी, कधी कधी टँकरने पाणीपुरवठा करणे आणि अन्य कारणासाठी होणारा वार्षिक खर्च हा सुमारे ५० लाख इतका आहे आणि पाणीपट्टीच्या माध्यमातुन मिळणारे उत्पन्न सुमारे ३० लाख इतके आहे. त्यामुळे उत्पन्नापेक्षा अधिक खर्च प्रशासनाला करावा लागत आहे. मात्र एवढं करूनही राजापूरकरांना पाण्यासाठी वणवणच करावी लागत आहे.

 

शहराला नैसर्गिक रित्या कोदवली धरणातुनच पाणीपुरवठा झाल्यास तो पुर्ण शहराला होऊ शकतो आणि पैसाही वाचू शकतो. कोदवली येथील या सायबाच्या धरणाला पर्यायी धरण निर्माण करण्यासाठी माजी विधानपरिषद सदस्या अ‍ॅड. सौ. हुस्नबानू खलिफे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले. सन २०१४ ते २०१९ काळात राज्यात सत्तेवर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नवीन धरणासाठी दहा कोटी रूपये मंजूर केले. त्यानंतर उशीराने या धरणाची निविदा प्रक्रिया होऊन काम सुरू झाले. पण प्रत्यक्षात मात्र आज हे धरण पुर्णत्वाला गेलेले नाही. या धरणासाठी प्रारंभी प्राप्त झालेला निधी अपुरा पडला व त्यानंतर पुन्हा अंदाजपत्रक करून आणखी आठ कोटी रूपयांच्या वाढीव निधीची मांगणी करण्यात आली. ती मागणी शासनाकडून मंजूर होऊन निधीही उपलब्ध करून देण्यात आला असून आता सदर कामासाठी निविदा काढण्यात आली आहे. आता निवीदा मंजूर झाल्यानंतर कामासाठी केवळ एकच महिना उरला असल्याने हे काम यावर्षीही पुर्णत्वाला जाण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे यावर्षी देखील राजापूरकरांना पाणीटंचाई दूर होण्यासाठी जून मध्ये येणाऱ्या मान्सूनचीच प्रतिक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे पुढील वर्षपासून तरी या १८ कोटीच्या धरणातुन राजापूरकरांना शुध्द पाणी मिळेल अशी राजापूरकरांची अपेक्षा आहे.

 

आजपर्यंत नगर परिषदेच्या तीन पंचवार्षिक निवडणूकांमध्ये या धरणाचे गाजर दाखन राजापूरकरांना २४ तास पाणी देणार अशा घोषणा करण्यात आल्या. प्रत्यक्षात मात्र आजही राजापूरकांरना पाणी पाणी करावे लागत आहे. त्यामुळे कोदवली येथीन नवीन पर्यायी धरण तरी राजापूरकरांची वर्षानुवर्षे सुरू असलेली पाण्यासाठीची वणवण संपवणार का? आणि राजापूरकरांना २४ तास पाणी मिळणार का? हे आगामी काळाच ठवरणार आहे