चौके – प्रतिनिधी : – चौके ग्रामपंचायतच्या वतीने १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी श्रीमती वेदवती गावडे आणि सौ. हर्षदा गावडे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
. जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय सिंधुदुर्ग यांच्याकडील आदेशानुसार गावामध्ये सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या दोन कर्तबगार महिलांचा सन्मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात यावा असे कळविण्यात आले होते. त्यानुसार चौके मांडखोलवाडी येथील श्रीमती वेदवती लक्ष्मण गावडे या चौके ग्रामपंचायतीच्या माजी सदस्य तसेच त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा विचार करून तसेच चौके वावळ्याचे भरड येथील बचत गटाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करीत असलेल्या सौ. हर्षदा हरिश्चंद्र गावडे यांची निवड करण्यात आली. त्यांना स्वातंत्र्यदिनी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये सरपंच श्री. पी. के. चौकेकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी मंडळ अधिकारी श्री. शिंगरे, महसूल अधिकारी श्री. गुरव, ग्रामपंचायत अधिकारी श्री. सरमळकर ,सामाजिक कार्यकर्ते श्री बिजेंद्र गावडे, तंटामुक्ती अध्यक्ष श्री. नितीन गावडे, पत्रकार संतोष गावडे व्यासपीठावर उपस्थित होते. ग्रामपंचायत अधिकारी श्री. सरमळकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून पूरस्काराबाबत माहिती दिली.
सामाजिक जाणीवेतून आज ग्रामीण भागातील महिला पुढे येत आहेत ही खरोखरच कौतुकास्पद बाब आहे. स्वातंत्र्य दिनी अशा कर्तबगार महिलांचा सन्मान करायला मिळाला आनंददायी बाब आहे. या कार्यक्रमातून इतरांनाही प्रेरणा मिळेल असे प्रतिपादन सरपंच श्री. चौकेकर यांनी केले.
या कार्यक्रमाला चौके पोलीस पाटील श्री रोहन चौकेकर, ग्रामपंचायत सदस्य श्री दुलाजी चौकेकर, सौ. विशाखा चौकेकर सौ. जयश्री कदम, सौ. अक्षता गायकवाड सेवानिवृत्त शिक्षक विजय चौकेकर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भाग्यश्री कुनुरे, आरोग्य केंद्राच्या डॉ. चैताली ढोले, महा-ई-सेवा केंद्राचे श्री. भगत, श्री. विनायक गावडे, श्री मयूर गावडे, श्री महेश सावंत, श्री मोहन गावडे, अंगणवाडी सेविका भारती सुकाळी, श्रीमती सुहासिनी परब, आशा स्वयंसेविका सौ. सिद्धाली गावडे, सौ. अनिता चौकेकर, श्रीमती नीरा सावंत, स्वप्नील चौकेकर, बचत गटाच्या प्रतिनिधी, ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामपंचायत लिपिक सौ. सुविधा गावडे यांनी आभार मानले.











