प्रियकराला न्यायालयाने चार वर्षाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा
जयगड येथील एका कंपनीच्या गेस्टहाउसच्या रुममध्ये घडली होती घटना
रत्नागिरी ः प्रतिनिधी
पतीशी फोनवर बोलत असल्याच्या रागातून प्रियकराने प्रेयसिचा खून केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपी प्रियकराला सोमवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ही घटना 14 डिसेंबर 2020 रोजी दुपारी 3.30 ते 4.15 वा. कालावधीत जयगड येथील डेक्कन ओव्हरसीज प्रा.लि कंपनीच्या गेस्टहाउसच्या रुममध्ये घडली होती.
मारुती राजाराम मोहिते (55,रा.घूणकी हातकणंगले,कोल्हापूर) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मारुती मोहिते हा या कंपनीत कामाला होता. तसेच मृत महिला ही त्या कंपनीमध्ये जेवण आणि साफसफाईचे काम करायची. त्यांच्यात ओळख होउन त्यांच्यात अनैतिक संबंध प्रस्थापित झाले होेते. परंतू मृत महिला ही आपल्या पतीशी फोनवर बोलते या गोष्टीचा आरोपी मोहितेला राग यायचा. दरम्यान 14 डिसेंबर रोजी ही दोघही कंपनीच्या गेस्ट होउसमधील रुममध्ये असताना त्या महिलेला पतीचा फोन आला. ती फोनवर बोलत असल्याचे पाहून मारुती मोहितेने रागाच्या भरात तिच्या डोक्यात किचन ट्रॉलीची पट्टीने मारहाण केली.
गंभिर जखमी झालेली महिला तिथेच रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावर मोहितेने रुमला बाहेर कडी लावून तिथून पळ काढला. काही वेळाने त्याठिकाणी कंपनीचा एक कामगार आला असता त्याला ती महिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसून आली. त्याने आरडा-ओरडा करताच कंपनीतील इतर कामगारांनी तिथे येउन जखमी महिलेला प्रथम जयगड येथील उर्जा रुग्णालय व नंतर रत्नागिरीतील निर्मल रुग्णालयात नेउन अधिक उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले होते. त्याठिकाणी उपचार सुरु असताना 16 डिसेंबर 2020 रोजी त्या महिलेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मृत महिलेचे चुलत सासरे रविंद्र वझे यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारीवरुन पोलिसांनी प्रथम भादंवि कलम 307 व ति महिला मृत झाल्यानंतर भादंवी कलम 302 अन्वये गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणी जयगडचे तत्कालीन पोलिस निरीक्षक नितीन ढेरे यांनी संशयिताला अटक करुन तपास करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होेते. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे पुष्पराज शेट्ये यांनी 19 साक्षिदार तपासले. यातील सरकारी कर्मचारी हर्षदा,डॉ.कुंभारे,डॉ.चौधरी यांची साक्ष महत्त्वाची ठरली. त्यांचा ेयुक्तिवाद ग्राह्य मानून जिल्हा व प्रमुख सत्र न्यायाधिश एस.एस.गोसावी यांनी आरोपीला भादंवि कायदा कलम 302 अन्वये दोषी मानून जन्मठेप आणि 10 हजार रुपये दंड तसेच भादंवि कलम 343 नुसार दोषी ठरवत 1 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली. या खटल्यात अॅड. पुष्पराज शेट्ये यांना अॅड.श्रुती शेट्ये यांनी साथ दिली. तसेच पैरवी अधिकारी म्हणून पोलिस उपनिरीक्षक अनंत जाधव, पोलिस हवालदार वंदना लाड, पोलिस उपनिरीक्षक क्रांती पाटील यांनी काम पाहिले.











