कु. पायल कोंडविलकर ८०.६० टक्के गुण मिळवत आली प्रथम
चिपळूण (वार्ताहर) : तालुक्यातील चिवेली पंचक्रोशी विकास मंडळ संचालित आदर्श विद्यामंदिर चिवेली हायस्कूलचा दहाचा निकाल १०० टक्के लागला आहे. हायस्कूलमध्ये कु.पायल कोंडविलकर हिने प्रथम क्रमांक मिळवत ८०.६० टक्के गुण प्राप्त केले आहेत.
गेले अनेक वर्ष आदर्श विद्यामंदिर चिवेली हायस्कूलने दहावीच्या १०० टक्के निकालाची गुणवत्ता कायम ठेवली आहे. अतिशय दुर्गम भागात जरी हायस्कूल असले तरीही संस्था आणि शिक्षक वर्ग यांनी मेहनत घेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. स्व. गोविंद शिर्के यांनी लावलेल्या या शैक्षणिक वृक्षाची वाटचाल निश्चितच अभिमानास्पद आहे. माध्यमिक शालान्त परीक्षा २०२५ चा निकाल सुद्धा यशाची उंची गाठणारा असून कु पायल प्रवीण कोंडविलकर हिने ८०.६० टक्के गुण मिळवून प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. द्वितीय क्रमांक विघ्नेश सुभाष शिबे ७८ टक्के गुण, तृतीय क्रमांक सानिका शांताराम शिबे ७६.२० टक्के गुण, चतुर्थ क्रमांक सिमरन मनोज जाधव ७५ टक्के गुण आणि पाचवा क्रमांक प्रतीक प्रकाश दणदणे ७४ टक्के गुण प्राप्त केले आहेत. संस्थेचे अध्यक्ष राजेश शिर्के, प्रमुख कार्यवाह रमेश शिर्के, शाळेचे मुख्याध्यापक संजय चव्हाण, शाखा समिती अध्यक्ष सुभाष शिर्के, सर्व संस्था पदाधिकारी, शालेय समिती पदाधिकारी, शिक्षक, कर्मचारी आणि पालक यांनी यशवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.











