लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील वेसुर्ले गावातील जंगलमय भागात असलेल्या वहाळाच्या ठिकाणी चार ते पाच वर्षांचा गवा मृत अवस्थेत आढळून आला आहे ही घटना आज मंगळवारी २० मे रोजी उघडकीस आली आहे.
याबाबत वनविभागाचे लांजा वनपाल सारीक फकीर यांनी माहिती देताना सांगितले की, तालुक्याच्या पश्चिम भागातील वेसुर्ले या गावातील डोंगराळ आणि जंगलमय भागात असलेल्या वहाळाच्या ठिकाणी आज हा मृतावस्थेतील गवा आढळून आला आहे. त्याचे वय अंदाजे चार ते पाच वर्षांचे असून वरून खाली पडल्याने आणि त्याच्या शरीराच्या अंतर्गत भागाला जोरदार मार बसल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे .
दरम्यान ज्या ठिकाणी हा गवा आढळून आला आहे ती जागा डोंगराळ भागात आहे . तिथे वाहन जावू शकत नाही. त्यात आज मंगळवारी मोठ्या प्रमाणात पाऊस असल्याने तिथून त्याला बाहेर काढण्यासाठी वनविभागा समोर अनंत अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे आज ज्या ठिकाणी तो मृत आढळून आला त्या ठिकाणी त्याचे पोस्टमार्टम करण्यात आले. तसेच आज सायंकाळी उशिरा झाल्याने उद्या बुधवारी त्याचे अंत्य संस्कार केले जातील असे वनविभागाकडून सांगण्यात आले.












