लांजा तालुका व्यापारी महासंघाच्या वतीने तिरंगा रॅली, माजी सैनिकांचा करण्यात आला सत्कार
लांजा (प्रतिनिधी) हिंदुस्तान जिंदाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद, वंदे मातरम च्या घोषणांनी लांजा शहर दणाणून सोडले.निमित्त होते ते लांजा तालुका व्यापारी महासंघाचे वतीने शुक्रवारी काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीचे.
दरम्यान, कोर्ले फाटा ते लांजा तहसील अशी काढण्यात आलेली ही तिरंगा रॅली तहसील कार्यालय येथे आल्यानंतर आमदार किरण सामंत यांच्या हस्ते माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला.

भारतीय लष्कर आणि शूर जवानांच्या पराक्रमाच्या सन्मानार्थ लांजा तालुका व्यापारी महासंघाच्या वतीने शुक्रवारी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. लांजा शहरातील कोर्ले फाटा येथून या तिरंगा रॅलीला १० वाजता सुरुवात झाली. यावेळी देण्यात आलेल्या घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला. मुर्दाबाद मुर्दबाद पाकिस्तान मुर्दाबाद, हिंदुस्तान जिंदाबाद, भारत माता की जय, वंदे मातरम च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला. या तिरंगा रॅलीत लांजा तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसन्न शेट्ये यांच्यासह सर्व व्यापारी संघाचे पदाधिकारी, व्यापारी बांधव, त्याचप्रमाणे विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महिला वर्गाचा सहभाग देखील लक्षणिय होता.
ही तिरंगा रॅली बाजारपेठेतून तहसीलदार कार्यालय या ठिकाणी नेण्यात आली. त्यानंतर लांजा तहसीलदार प्रियंका ढोले यांना निवेदन सादर करण्यात आले. तर भारतीय शूर जवानांच्या सन्मानार्थ या ठिकाणी उपस्थित असलेले आमदार किरण सामंत यांच्या हस्ते लांजा तालुक्यातील माजी जवानांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये गजानन साळवी, सुरेश जाधव, मंगेश पाटील, सुहास पुरात यांचा समावेश होता.
यावेळी बोलताना आमदार किरण सामंत म्हणाले की,देशासाठी लढणाऱ्या सैनिकांमुळं आम्ही सुखानं झोपतो, व्यापारी संघटनेच्या वतीने जी रॅली काढण्यात आली ती रॅली कुठल्याही पक्षाची नाही तर लांजावासियांची आहे, राष्ट्रप्रेमाची आहे, अशी भावना व्यक्त करत आज देशातील नागरिक देशाच्या सीमेवर लढत असलेल्या सैनिकांमुळे सुरक्षित असल्याचे आमदार किरण सामंत म्हणाले.












