ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
सावंतवाडी । प्रतिनिधी : “विद्यार्थ्यांना योग्य प्रेरणा मिळाल्यास त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी त्यांच्यात प्रचंड उत्साह निर्माण होतो,” असे मौलिक विचार ॲड. सुभाष पणदूरकर यांनी ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाने आयोजित केलेल्या विद्यार्थी सन्मान सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून बोलताना व्यक्त केले.
कळसुलकर हायस्कूल येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांना ध्येय निश्चिती, कठोर परिश्रम आणि स्पष्ट विचारांचे महत्त्व पटवून दिले. ते म्हणाले, “आपल्या शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे महत्त्वाचे आहे. तसेच, विद्यार्थ्यांनी जीवनात एक ध्येय घेऊन जगावे आणि ते साध्य करण्यासाठी अविरत प्रयत्न करत राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत संस्थापक अध्यक्ष वाय. पी. नाईक यांनी केले. यावेळी मान्यवरांना सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
तर दहावी उत्तीर्ण झालेल्या रेश्मा पालव (९९.४० टक्के, इन्सुली – तालुक्यात प्रथम), विद्यापीठात प्रथम आलेल्या विधिता केंकरे, तसेच वैभवी बांदेलकर (९५ टक्के), आदी पाटील (९७.६० टक्के), रिना वेंगुर्लेकर (९३ टक्के), सुमुख केंकरे, अवनीश लोंढे, निशाद सावंत या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. तसेच क्रीडा क्षेत्रात कॅरम स्पर्धेत विजेतेपद पटकावल्याबद्दल आस्था अभिमन्यू लोंढे हिचाही विशेष गौरव करण्यात आला.
याप्रसंगी बालसाहित्यिक मनोहर परब यांचाही शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कळसुलकर प्रशाळेला यावर्षी १२५ वर्षे पूर्ण होत असून, या शैक्षणिक दीर्घ परंपरा लाभलेल्या शाळेचे नवनियुक्त मुख्याध्यापक एस. व्ही. भुरे यांनाही ज्ञानदीप मंडळातर्फे शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
मनोगतातून व्यक्त झाली कृतज्ञता
यावेळी सन्मानित विद्यार्थी विधिता केंकरे, आदी पाटील, रेश्मा पालव आणि निशाद प्रदीप सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ज्ञानदीप मंडळाने सन्मानित करून दिलेल्या प्रेरणा, प्रोत्साहन आणि कौतुकाची थाप यामुळे त्यांच्यात नवीन ऊर्जा संचारली असून, त्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी रमेश बोंद्रे, भरत गावडे, गोविंद वाडकर, मनोहर परब, प्रा. उत्तम पाटील, एस. व्ही. भुरे, संदेश पालव, वैभव केंकरे आदी मान्यवरांनीही मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले.
यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष ॲड. सुभाष पणदूरकर यांच्यासह मंडळाचे अध्यक्ष जावेद शेख, एस. आर. मांगले, भरत गावडे, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, गोविंद वाडकर, रमेश बोंद्रे, उदय बांदेलकर, सौ. प्राची प्र. सावंत, आत्माराम पालेकर, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप सावंत, सिद्धेश कुळकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ. सोनाली बांदेलकर यांनी केले, तर सूत्रसंचालन अनिल ठाकूर यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थी, पालक वर्ग आणि मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.











