दापोली l प्रतिनिधी: ज्यांनी आपले आयुष्य अर्ध्यापेक्षा जास्त सैन्य दलात देशाची सेवा करण्यात घालवले असे सेवा निवृत्त नायब सुबेदार प्रताप वसंत पाटणे. ज्यांचे वडील वसंत शंकर पाटणे हे सुबेदार तर आजोबा शंकर पाटणे यांंनीसुद्धा सैन्य दलातच सेवा केली. अशी सैनिकी परंपरा दापोली तालुक्यातील टांगर गावाची आहे. या गावाने असंख्य सैनिक दिले.
माजी निवृत्त नायब सुबेदार प्रताप वसंत पाटणे हे 31 मे रोजी निवृत्त होऊन आपल्या जन्मगावी परतल्यावर दापोली तालुक्यातील माजी सैनिक संघटना, श्रीजी गुलमोहर सोसायटीतील सर्व सदस्य, दापोली तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून केळस्कर नाक्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भारत माता की जय, जय जवान- जय किसान, वन्दे मातरम् व डी.जे. वर देशभक्तीपर गीतांच्या तालात नाचत नाचत श्रीजी गुलमोहर सोसायटीतील प्रताप पाटणे यांच्या निवासस्थानापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली.
श्रीजी गुलमोहरच्या प्रवेशद्वारावरच महिलांनी ओवाळून नंतर श्रीजी गुलमोहर सोसायटीतील गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेऊन पुष्पवृष्टी करत कार्यक्रम स्थळी आणले.
निवृत्त नायब सुबेदार प्रताप पाटणे यांच्या शुभेच्छा समारंभाचे अध्यक्षस्थान श्रीजी गुलमोहर सोसायटीतील विजय चव्हाण यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे विश्वास काका कदम (माजी जिल्हा बांधकाम व आरोग्य सभापती), दापोली तालुका माजी सैनिक अध्यक्ष सुरेश जाधव, संजीवन साळवी, सुनिल इदाते, रघुनाथ कासार, संदीप यादव, गणेश जाधव, महेंद्र कालेकर, दापोली पोलीस स्थानकातील पोलीस निरीक्षक नितीन यादव, टांगर गावचे पोलीस पाटील अतुल मोरे, ग्रामस्थ अर्जुन सावंत व इतर मान्यवर तसेच श्रीजी गुलमोहर सोसायटीतील सर्व पदाधिकाऱ्यांसह, सभासद, महिला मंडळ, तरुणाई सत्कारमूर्ती प्रताप पाटणे यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.
सत्कारमूर्ती प्रताप पाटणे यांनी आपल्या मनोगतात- देश सेवा 24 वर्ष 24 दिवस सन 2021 मध्ये नाशिक येथे प्रशिक्षण घेऊन आपल्या सैन्य दलातील सेेवेला पंजाब येथून सुरुवात केली. सलग 24 वर्ष 24 दिवस ही सेवा आपल्या राज्याबाहेर म्हणजे जम्मू कश्मीर व पंजाब येथे पूर्ण केली. हवालदार नायब सुभेदार या पदावरती निवृत्त झालो. सैन्य दलात देशाची करत असताना सौभाग्यवती रेश्मा, मुलगी रुंजी व मुलगा रुद्र, वडील सुबेदार वसंत पाटणे, आई लक्ष्मीबाई, भाऊ प्रविण व मामा संदीप कदम यांची मोलाची साथ लाभली. “अजुनही संधी मिळाली असती तर अजूनही देश सेवा केली असती.” असे गौरवोद्गार निवृत्त नायब सुबेदार प्रताप पाटणे यांनी काढले.
कार्यक्रमात उपस्थित असलेल्या अनेक मान्यवरांनी निवृत्त नायक सुभेदार प्रताप पाटील यांच्या विषयी गौरवोद्गार काढले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सत्यवान दळवी यांनी आपल्या सुरेख वाणीने केले. त्याचबरोबर श्रीजी गुलमोहर सोसायटीतील बालकलाकारांनी देशभक्तीपर गीतावर सुंदर नृत्य सादर केले. त्यानंतर सहभोजनाने कार्यक्रम संपला.










