राज्य पुरातत्व विभाग सहाय्यक संचालक विलास वाहने यांची स्पष्टोक्ती
स्थानिकांना विश्वासात घेऊन व माहिती देऊनच काम सुरू
जैतापूर (वार्ताहर): राजापूर तालुक्यातील नाटे येथील घेरा यशवंतगड किल्ल्याच्या डागडुजी आणि दुरुस्तीचे काम शासनाच्या पुरातत्व विभागाकडून सुरू असून पावसामुळे एका बाजूची भिंत ढासळली आहे ही वस्तुस्थिती आहे. मात्र या किल्ल्याच्या दुरुस्तीचे आणि डागडुजीचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. या किल्ल्याचे डागडुजी आणि दुरुस्तीचे काम हे योग्य पध्दतीने व दर्जेदार असे केले जाईल अशी माहिती महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने दैनिक प्रहारशी बोलताना दिलरी आहे.
राजापूर तालुक्यातील नाटे परिसरातील श्री घेरा यशवंतगड किल्ल्याचे डागडुजी आणि दुरुस्तीचे काम सुरू असून आठ दिवसांपूर्वी नवीन बांधकाम केलेली एक भिंत ढासळली आहे. या घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थ आणि शिवप्रेमींनी ठेकेदार आणि पुरातत्व विभागाच्या कारभारा बाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अशा प्रकारे विश्वासात घेतले नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या ऐतिहासिक वास्तुचे काम करताना संबधितांनी स्थानिकांना कामाबाबत काहीच माहिती दिलेली नाही अशाही तक्रारी केल्या आहेत. सदरचे काम हे निकृष्ठ दर्जाचे होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. याबाबत बुधवारी दैनिक प्रहारमध्ये वृत्तही प्रसिध्द झाले आहे.
याबाबत महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाचे सहाय्यक उपसंचालक विलास वाहने यांच्याशी संपर्क साधला असता घेरा यशवंतगड हा किल्ला पुरातत्त्व विभागाकडे संरक्षित स्मारक म्हणून असून याची देखभाल दुरुस्ती या विभागाकडूनच होत असते. त्या अनुषंगाने किल्ला संवर्धनासाठी पुरातत्व विभागाने प्रस्ताव पाठविला होता. या कामासाठी निधी मंजूर झाल्यानंतर सर्व प्रक्रिया पार पाडून दुरुस्ती आणि डागडुजीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
कामाच्या प्रारंभी करताना स्थानिक ग्रामस्थांसह शिव संघर्ष संघटनेचे अध्यक्ष यांना माहिति देण्यात आली होती व या कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला स्थानिकांसह शीवसंघर्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. त्यानंतर देखील वेळोवेळी ज्यांनी ज्यांनी या कामाबाबत माहिती विचारली आणि संपर्क केला त्यांना आवश्यक माहिती देण्यात येत होती असेही वहाने यांनी सांगितले.
स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून आमदार किरण सामंत यांच्या प्रतिनिधी कडून देखील या कामाबाबत विचारणा करण्यात आली आहे. आमदार सामंत यांची वेळ घेऊन त्यांना देखील प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन माहिती देण्यात येणार आहे. तर ज्यांना या कामाविषयी माहिती हवी असेल त्या ग्रामस्थ आणि अन्य स्थानिक लोकप्रतिनिधी यांनाही माहिती देण्याची आपली तयारी असल्याचे वहाने यांनी सांगितले.
शासनाचा पुरातत्व विभाग ऐतिहासिक वास्तू आणि संदर्भ जोपासण्याचा आणि संरक्षित करण्यासाठी काम करते, त्यामुळे कोणतेही ऐतिहासिक संदर्भ मिटविण्याचा प्रयत्न केला जात नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. जर असं कोणाच्या निदर्शनास येत असेल तर त्यांनी ते कृपया दाखवून द्यावं असे आवाहनही वहाने यांनी केले आहे. घेरा यशवंतगड हे संरक्षित स्मारक असून त्याचे संवर्धन व्हावे यासाठी आलेल्या निधीचा योग्य आणि चांगल्या पद्धतीने वापर करून या ऐतिहासिक वास्तुचे काम हे अत्यंत चांगले व दर्जदार केले जाईल अशी ग्वाहीही वहाने यांनी दिली आहे.












