चिपळूण (प्रतिनिधी)–: श्री स्वामी समर्थ मठ ते रामेश्वर मंदिरदरम्यानच्या रस्त्याचे काम सध्या सुरू असून, पावसामुळे रस्ता पूर्णपणे चिखलमय झाल्याने नागरिकांना पायी चालणे तसेच वाहनाने प्रवास करणे अत्यंत कठीण आणि धोकादायक ठरत होते. या समस्येमुळे संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी शिवसेना शहरप्रमुख श्री. उमेशजी सकपाळ यांच्याकडे तक्रार नोंदवली होती.
नागरिकांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत उमेशजी सकपाळ आणि शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष पवार यांनी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना घेऊन सदर ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिली. त्यांनी रस्त्याची पाहणी केली आणि रस्त्याच्या बिकट अवस्थेची जाणीव प्रशासनाला करून दिली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे प्रशासनाला जाग येऊन अखेर रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली. रस्त्याचे काम हाती घेतल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांनी उमेशजी सकपाळ यांचे आभार मानले आहेत.
या भागातील रस्ता अत्यंत महत्त्वाचा असून, धार्मिक स्थळांकडे जाणाऱ्या नागरिकांची ये-जा या मार्गावरून होते. त्यामुळे या रस्त्याची सुधारणा होणे गरजेचे होते. नागरिकांचे प्रश्न वेळेत सोडवून दिल्यामुळे शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाबाबत जनतेत विश्वास वाढताना दिसत आहे.













