मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे यांचा इशारा, भीषण अपघातास प्रशासनच जबाबदार
खेड |प्रतिनिधी : मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे जगबुडी पुलावर झालेल्या भीषण अपघातात ६ जणांना हकनाक प्राण गमवावे लागले. या अपघातास सर्वस्वी प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे यांनी केला आहे. अजूनही प्रशासनाने उपाययोजनांची आखणीच केलेली नाही. त्यामुळे प्रशासनाला जागे{ करण्यासाठी लवकरच आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
२० मे रोजी मिरा रोड मुंबई येथून देवरुखला जाणारी कार जगबुडी नदीत कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला. मात्र प्रशासन अजूनही सुस्तच आहे. भीषण दुर्घटना घडून १५ दिवसांचा कालावधी लोटला तरी गर्डर बसवण्याची तकलादू मलमपट्टी राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून करण्यात आली आहे. यामुळे वाहनचालकांचा जीव टांगणीवर आहे. आणखी किती बळी हवेत, असा सवालही उपस्थित केला आहे.
भरणे येथील नव्या जगबुडी पुलावर सातत्याने अपघात घडत आहेत. तरीदेखील राष्ट्रीय महामार्ग खात्याने हाताची घडी अन् तोंडावर बोट ठेवण्यातच धन्यता मानली आहे. ही खेदजनक बाब असून प्रशासन वाहनचालकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोपही केला आहे. राष्ट्रीय महामार्ग खात्याने अपघात रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजना हाती न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.












